कोल्हापूर : पोलिसांचा वचक होतोय कमी

कोल्हापूर : पोलिसांचा वचक होतोय कमी
Published on
Updated on

कोल्हापूर, डॅनियल काळे : कोल्हापुरात अलीकडे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहे. खून, मारामारी, दरोडा, चोर्‍या अशा घटना एकामागून एक घडत आहेत. परिणामी, दहशतीचे वातावरण पसरत आहे. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेऊन वचक निर्माण करणार्‍या अधिकार्‍यांची कोल्हापुरात गरज भासत आहे. पोलिस आणि जनता यांच्यातील संवाद कमी होत आहे.

गेल्याच महिन्यात शहरातील टेंबलाई नाका परिसरात कुटुंबीयांसोबत जेवायला बसण्याच्या तयारीत असतानाच घरात घुसून एकाने केलेल्या तलवार हल्ल्यात एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला. संबंधित व्यक्ती काही तरी करणी करत असल्याच्या संशयावरून तरुणाने हल्ला केला. त्यानंतर काही दिवसांनी गजबजलेल्या शिवाजी पेठ सारख्या परिसरात लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी येथील दोन गटांत पोस्टर फाडल्याच्या रागातून सुरू असलेल्या वैमनस्यातून एका तरुणावर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला.

रूईकर कॉलनीसारख्या उच्चभ्रू वसाहतीत बंगल्यात चोरटे आरामात चोरी करून निघून गेले. बालिंगा येथे भरदिवसा धाडसी दरोडा टाकून चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिले. व्हीनस कॉर्नर आणि आता राजेंद्रनगर परिसरात किरकोळ कारणावरून दोन गट एकमेकाला भिडले आणि एकमेकांवर हल्ला, प्रतिहल्ला करू लागले. या सगळ्या घटना पाहिल्या तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत असल्याची लक्षणे आहेत. त्यातच पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा काळ होता. दर आठ, पंधरा दिवसाला नवाच पोलिस अधिकारी अशी स्थिती प्रमुख पोलिस ठाणी असणार्‍या शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याची झाली आहे.

शहरात पोलिसांचे पेट्रोलिंग, रात्रीची गस्त, खबर्‍यांशी संवाद, डिटेक्शन, लोकांशी असणारा संवाद कमी झाल्याने किंवा गुन्हेगारीवृत्ती कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, उपक्रम बंदच पडल्याने गुन्हेगारी वाढत आहे.

खमक्या अधिकार्‍यांची गरज

तत्कालीन पोलिसप्रमुख आर. के. पद्मनाभन यांनी शहरातील चौकात पोलिस उभे केले होते. त्या परिसरात असणार्‍या सर्व लहान-मोठ्या घटनांना त्यामुळे आळा बसला. माळकर तिकटीला ट्रॅफिक पोलिसांनी वन-वेतून जाणार्‍या दोघांना अडवले त्यांची कसून चौकशी केली तर ते अट्टल दरोडेखोर निघाले. रमेश बनकर, पी. जी. मांडरे, के. टी. विधाते, मदन पाटील, भीमराव चाचे, मा. शा. पाटील, कुरुंदकर, अमृत देशमुख अशा पोलिस अधिकार्‍यांचा दरारा होता. अलीकडे पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांनी बर्‍याच जणांच्या मुसक्या आवळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news