

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गर्भलिंग निदान चाचणी केल्याच्या संशयावरून राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर सोमवारी सकाळी महापालिका आरोग्य विभागाने कारवाई केली. शनिवार पेठेतील अंकिता कालेकर, त्यांचे पती दिग्विजय यांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर व महापालिका आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशनद्वारे गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाचा जबाब नोंद करून कारवाई केली. आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षदा वेदक, विभागीय समुचित प्राधिकारी डॉ. रती अभिवंत व पंच यांनी सोनोग्राफी मशिन सील केले. डॉ. बंडा पाटील, डॉ. संजना बागडी, अॅड. गौरी पाटील या कारवाईत सहभागी होते.