कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजारामपुरी येथील एस. आर्केड बिल्डिंगमधील गाळा नंबर एफ 9 मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्या हायप्रोफाईल वेश्याअड्ड्याचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला. कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. अड्डाचालक सुरेखा मिलिंद सरवदे (वय 26) हिच्यासह पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या अन्य संशयितांमध्ये स्नेहा विजय माळी (20, सध्या रा. लाईन बाजार, कसबा बावडा, मूळ गावचिपळूण, रत्नागिरी), उमेश बाळू शिंदे (31, महादेव गल्ली, पाचगाव), गणेश फुलचंद सोनवणे (कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा), वैभव बजरंग हवालदार (23, पाचगाव) यांचा समावेश आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
राजारामपुरीत एलिस स्पा अँड वेलनेस सेंटरमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय चालत असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना या अड्ड्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक सायली कुलकर्णी यांना कारवाईच्या सूचना केल्या.
पथकाने शुक्रवारी दुपारी मसाज सेंटरवर छापा टाकला. यावेळी चार पीडित महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करून अड्डाचालक सुरेखा सरवदे, स्नेहा माळीसह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरच्या झडतीत निरोधची पाकिटे, नोंदवही, मोबाईल, वाहनासह एक लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, या रॅकेटमध्ये पडद्याआड दडलेल्या संशयितांचाही पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी होत आहे. अटक केलेल्या संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.