

कोल्हापूर: काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बळकटीसाठी जिल्हाध्यक्षांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्यता दिल्यानंतर पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी अधिकृत घोषणा केली.
राजकीय वर्तुळात या यादीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा प्रभाव असल्याची चर्चा सुरू आहे. नव्या नियुक्त्यांनुसार कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री सतेज पाटील यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रवीण केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडघे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे शहर पूर्व अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप आणि पुणे शहर पश्चिम अध्यक्षपदी माजी महापौर दीप्ती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या नियुक्त्यांमुळे राज्यातील संघटनात्मक बांधणीला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.