आजारी असूनही प्रचारासाठी उद्धव ठाकरे फिरले; पण हाती काय लागले?

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरे यांनी घेतली. आजारपण असूनही प्रचारासाठी ते खूप फिरले; मात्र त्यांना 9 जागा मिळाल्या. युती असती तर चित्र वेगळे असते. याचे उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. शेंडापार्क येथे वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानंतर मंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही, पण मी काय मिळवले? हाताशी काय लागले? अल्पसंख्याकांच्या मतांवर निवडून आलेला पक्ष असा ठपकाही बसला, याचे ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

मंत्री पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी घोषित करण्यास झालेला उशीर लक्षात घेऊन त्याची वेळीच दुरुस्ती होईल. पुणे लोकसभा मतदारसंघात सामुदायिक काम चांगले झाले. तेथे संविधान यात्राही काढली. मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून त्यांना वस्तुस्थिती सांगावी लागणार आहे. कांदा आणि मराठा आरक्षण याबाबत सरकारने काय काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो.

मंत्री पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली; मात्र भाजपमध्ये नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते. आज्ञा करायची नाही. त्यामुळेच आम्ही टिकून आहोत. अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना थांबण्यास सांगितल्याने फडणवीसांनी आपला निर्णय मागे घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

65 हजार झाडे लावणार

चंद्रकांत पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्ताने 65 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. कोल्हापुरातील शेंडा पार्क या ठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर या जिल्ह्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले जात आहे. केवळ वृक्षारोपण न करता त्याचे संगोपन करण्याची जबाबदारीही घेतली आहे. दरवर्षी चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होतो. यावर्षी त्यांना 65 वर्षे पूर्ण होत असल्याने 65 हजार वृक्ष लावले जाणार आहेत.

कागलमधील मतदानावरून मुश्रीफ, मंडलिक, घाटगेंनी एकत्रित चर्चा करावी

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये आम्ही कमी पडलो, अशी कबुली देत हा पराभव आणि कागल विधानसभा मतदारसंघात मंडलिकांना पडलेल्या मतांबाबत हसन मुश्रीफ, संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांनी एकत्र बसून चर्चा करावी, अशी सूचना मंत्री पाटील यांनी केली.

तावडे कर्तृत्ववान, त्यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत

मंत्री पाटील म्हणाले, विनोद तावडे भाजपमध्ये मोठे होतील. ते मोठे झाल्यास आम्हाला आनंदच आहे. भाजपमध्ये ज्या स्तरावर ठरते ती गोष्ट शेजारच्या मुंगीलाही कळत नाही. विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना जिथे पाठवू तिथे यश मिळविण्यासाठी ते बारकाईने लक्ष देतात. तावडे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत काम करतात. पक्ष चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे तावडे यांना काय द्यायचे आणि काय नाही, हे केंद्र सरकार ठरवेल. तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत, असे मंत्री पाटील म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news