India World Champion 2026 : छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष

भारत विश्वविजेता झाल्यानंतर तरुणांचा आनंदोत्सव; फटाक्यांची आतषबाजी
India World Champion
छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष
Published on
Updated on

कोल्हापूर : दिवसभर रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघालेल्या कोल्हापूरकरांनी रविवारी रात्री भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी पंचमी साजरी केली. शहरातील विविध भागांतून तरुण मोठ्या संख्येने येथे एकत्र आले. त्यांनी रंगांची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात अन्‌‍ फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळविल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अबालवृद्धांनी एकच गर्दी केली. शहरातील विविध भागांतून दुचाकीवरून जल्लोष करत तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत होते. बघता बघता चौक तरुण, तरुणी, महिला, बालचमूच्या गर्दीने फुलून गेला. ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’, ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘वंदे मातरम्‌‍‌’, ‌‘जय श्रीराम‌’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी काही तरुण येथे ढोल-ताशांसह दाखल झाले. ढोल-ताशांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली अन्‌‍ त्यांनी एकच जल्लोष केला.

इचलकरंजीतही जल्लोष

इचलकरंजी : भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरून इतिहास घडवल्यानंतर इचलकरंजी शहरातही जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. रंगपंचमीचा उत्साह ओसरताच क्रिकेटप्रेमींनी टीव्हीसमोर ठाण मांडले आणि भारताच्या विजयासोबतच रंगपंचमी साजरी केली. रात्री सव्वा दहा वाजल्यापासूनच शहरातील विविध चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. नागरिकांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. शंभूतीर्थ चौक परिसरात पुन्हा रंगांची उधळण करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

नेहमीप्रमाणे के. एम. मालाबादे चौकात पाच ते दहा हजारांहून अधिक क्रीडाप्रेमी एकत्र जमले होते. पारंपरिक पद्धतीने नृत्य करत ‌‘भारत माता की जय‌’ अशा घोषणा देत चौक व मुख्य रस्ते दुमदुमून गेले. अनेकांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. मोठ्या प्रमाणात फटाके फोडून भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रात्री आठ वाजल्यापासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे शहरात उशिरापर्यंत जल्लोषाचे वातावरण कायम होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news