

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हॉर्ट अॅटॅकचे निदान करणार्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे. त्यास भारत सरकारकडून नुकतेच पेटंट मिळाले आहे. या पेटंटसाठी डॉ. परळे यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये अॅप्लिकेशन केले होते.
हृदयरोगामुळे मृत्यू होणार्या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान होणे हेदेखील प्रमुख कारण आहे. हृदयरोगाचे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्त्वपूर्ण चाचणी म्हणजे ईसीजी; मात्र गाव-खेड्यात ईसीजी मशिन देखील उपलब्ध नसतात. अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे डॉ. परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे. हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ईसीजी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे.
हार्ट अॅटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा 12 ङएऊ एउॠ फक्त या उपकरणाद्वारे शक्य असल्याचा दावा डॉ. परळे यांनी केला आहे. वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यांनंतर या उपक्रमास नुकतेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले असल्याचे डॉ. परळे यांनी सांगितले. जवळपास 1300 रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर असे पॉईंटस् शोधण्यात आले. 2020 मध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीओलॉजी कॉन्फरन्स मध्ये मांडण्यात आले. यासोबतच विविध अभ्यासांद्वारे हे पॉईंट्स नेहमीच्या ईसीजी पॉईंट्स सारखेचं असल्याचे सिद्ध केले. ही ह्या जॅकेट निर्मितीची पहिली पायरी होती, अशी माहिती डॉ. परळे यांनी दिली.