

कोल्हापूर महापालिकेच्या संभाव्य हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर पुलाची शिरोली गावातील नागरिकांनी आज एक अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन छेडले. "शोले" चित्रपटातील जय-वीरूच्या स्टाईलने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याच्या हालचालींना विरोध करत ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. "शिरोलीसारख्या गावांना सध्या ग्रामपंचायतीमार्फत सर्व आवश्यक सुविधा मिळतात, मग महापालिकेत सामील करून केवळ उत्पन्न वाढवण्यासाठी आमच्या गावाचा वापर का?" असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
महापालिका हद्दवाढीनंतर काय सुविधा मिळतील, यावर अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नाही. त्यामुळे शिरोलीला स्वतंत्र नगरपरिषद देण्यात यावी आणि महापालिकेत समाविष्ट न करता गावाचा स्वतंत्र विकास साधावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले असून, हद्दवाढ थांबवण्यात आली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी टाकीवरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
सध्या महापालिकेने 18 गावं आणि दोन एमआयडीसी परिसरांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर राज्यस्तरीय चर्चा आणि बैठका सुरू असून, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, विरोधकांनी गावांमध्ये बंद पुकारला आहे. त्यांनी मुंबईतील बैठकीनंतर एकमत साध्य होईल, असे आश्वासन दिले आहे. विरोधकांचा विरोध महापालिकेच्या कार्यक्षमतेवर आधारित असून, त्यांनी मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेले अपयश, स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद आणि राजकीय हितसंबंध या मुद्द्यांवर आवाज उठवला आहे.
दुसरीकडे, सहमत समितीच्या मते हद्दवाढ झाल्यास शहरी विकास, वाहतूक, पूर नियंत्रण, स्वच्छता यांसारख्या अनेक समस्या सुटू शकतात.