

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित होऊनही कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा वारंवार खंडित का होतो, कोल्हापूरकरांना दररोज दोन वेळा स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी मिळणार, असा थेट सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला केला. थेट पाईपलाईन योजनेतील समस्या आणि पाणीपुरवठ्यातील विस्कळीतपणा यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी थेट पाईपलाईनसाठी आवश्यक असलेल्या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या प्रस्तावाला मंगळवारीच मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तथापि, हे काम पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शिंगणापूर पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
या योजनेच्या मूळ आराखड्यावरच बोट ठेवत इतक्या लांब अंतराच्या थेट पाईपलाईन योजनेचे काम करताना भूमिगत वीज वाहिन्यांची गरज सल्लागारांच्या लक्षात आली नाही का, याचा सखोल अभ्यास झाला नव्हता का, अशी विचारणा करत मुश्रीफ यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. ते पुढे म्हणाले, शहरात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुम्ही टँकरने पाणीपुरवठा करत आहात. पण, इतक्या मोठ्या शहराला टँकरने पाणी पुरवणे कितपत शक्य आहे?
यावर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले की, शहरातील काही भागांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांसाठी 19 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निधी मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच, शिंगणापूर योजनेचे कामही वेगाने सुरू असून, ते लवकरच पूर्णत्वास येईल.
मंत्री मुश्रीफ यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. हा प्रस्ताव मंगळवारी मुंबईत संबंधित अधिकार्यांशी भेटून तत्काळ मार्गी लावला जाईल. तथापि, निधी मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तोपर्यंत शिंगणापूर योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित करून कोल्हापूरकरांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशा कडक सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जलअभियंता रमेश मस्कर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.