

शिरोली दुमाला : शिरोली दुमाला ते नरगेवाडी मार्गावरील गळी माळ नावच्या डोंगरावर तब्बल १५ गव्यांचा कळप दिसून आला. शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विशाल पाटील हे त्यांच्या जनावरांच्या गोठ्याकडे गेले असता त्यांना हा गव्यांचा कळप दिसला.
मोठ्या संख्येने गवे आल्याचे पाहून त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत व काही ग्रामस्थांना याची कल्पना दिली. ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, सदस्य अरुण पाटील, सागर घोटणे, ग्रामपंचायत लिपीक शिवकुमार पाटील घटनास्थळी धाव घेतली. गावातील काही नागरिकांनी गव्यांना या परिसरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दिवसभर ग्रामस्थ गव्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गवे फिरून फिरून या परिसरात घुटमळत राहिले.
दरम्यान सरपंच सचिन पाटील यांनी वनविभागास संपर्क करून याची कल्पना दिली. त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांनी फोन करून कळविले. मात्र ५ वाजून गेले तरी वनविभागाचा पत्ता नव्हता. त्यामुळे वनविभागाच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.