

Bhogavati KDCC Bank Fire
राशिवडे: भोगावती साखर कारखाना समोरील जिल्हा बँकेच्या शाखेला मध्यरात्री दीडच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या दुर्घटनेत संगणक, इलेक्ट्रीकल साहित्य, खुर्च्यासह महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पंधरा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जिल्हा बँकेची भोगावती कारखान्यासमोर शाखा आहे. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास शाखेतून धूर, आग लागल्याचे कारखाना सुरक्षारक्षकांना दिसून आले, त्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या आगीमध्ये काऊंटर, संगणक, इलेक्ट्रीकल साहित्य, कागदपत्रे जळून खाक झाली.
सुदैवाने बँकेमधील रोकडसह सोने सुरक्षित राहिले. जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर यांनी भेट देऊन चौकशी केली. या घटनेचा अद्याप पंचनामा केलेला नाही, बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.