

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक हळूहळू रंगात येत असून प्रचाराने प्रभागाचे वातावरण तापत आहे. या निवडणुकीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शहराच्या विकासाचे प्रमुख भागीदार असलेले सभांव्य नगरसेवक मात्र यापासून अलिप्तच आहेत. ते मतदारांना हात जोडत मते मागत आहेत. नेतेच एकमेकांना टार्गेट करत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचा उडत असलेल्या धुरळा शहर विकासाच्या प्रश्नांवर बसल्याचेच चित्र सध्या तरी दिसत आहे.
महापालिकेच्या 81 जागांसाठी गुरुवारी (दि. 15) मतदान होणार आहे. मतदानासाठी आता केवळ नऊच दिवस उरले आहेत. या कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. उमेदवारांचा गल्ली-बोळात पारंपरिक पद्धतीने प्रचार सुरू आहेच, शिवाय दुसरीकडे उमेदवारांच्या नेत्यांचा कॉर्नर सभा, पदयात्रा, जाहीर सभांतून प्रचार सुरू आहे. नेत्यांच्या प्रचारात मात्र विरोधकांवर टीका, आरोप यावरच अधिक भर दिला जात असल्याचे चित्र आहे.
महापालिकेचे रणांगण टीका- प्रतिटीकेतून गाजत आहे. शहर विकासाऐवजी एकमेकांची उणीधुणीच काढण्याचे काम सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच बहुतांश ठिकाणी लढत होत आहे. महाविकास आघाडीचा किल्ला आमदार सतेज पाटील लढवत आहेत, दुसरीकडे त्यांच्या विरोधात महायुतीतून मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ असे तीन मंत्री आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. पाटील यांचे स्वप्न असलेल्या थेट पाईपलाईनवर हल्ला चढवला. या योजनेत ढपला पाडून त्यातील रक्कम कसबा बावड्यात गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिले.
दुसरीकडे रंकाळ्यातील कारंजाबाबत भाष्य करत आ. पाटील यांनी आ. क्षीरसागर यांनाही डिवचले आहे. त्यावर क्षीरसागर यांनीही पाटील यांना आव्हान दिले आहे. दुसरीकडे महायुतीचा राज्यात घटक पक्ष असलेल्या आणि महापालिकेत महायुतीच्या विरोधात गेलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आ. विनय कोरे यांना 500 कोटींची जमीन 30 कोटींना दिल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला, तर त्यावर कोरे यांनी त्यांच्या जागांची कुंडली काढण्याची वेळ आल्याचा इशारा दिला.
या सर्वांत प्रभागांचा आणि पर्यायाने शहराच्या विकासावर कोण ठोसपणे बोलताना दिसत नाहीत. शहर विकासाबाबत सत्तेत असताना यांनी काय केले, असाच सवाल करत पुन्हा नेत्यांचीच उणीदुणी काढली जात आहेत.
शहराची दयनीय अवस्था, नेत्यांची मात्र अनास्थाच...
शहराच्या गरजा काय आहेत, शहराला आता नेमकी कशाची गरज आहे, शहर कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, त्यात कोणता आणि कसा बदल करायला हवा, सर्वांगीण विकासाचा द़ृष्टिकोन कसा आहे, त्यानुसार कशी पावले पडतील, त्यातून शहराचा चेहरामोहरा कसा बदलेल, हे मात्र कोणीच सांगताना सध्या तरी दिसत नाही. शहरांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत. त्याची सोडवणूक होत नाही आणि त्याकरिता काही ठोस पर्याय देताना ना नेते दिसत आहेत, ना उमेदवार!
सर्वच सत्तेत... तरीही ‘तुम्ही काय केले..?’
या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांना सत्तेत असताना शहरासाठी तुम्ही काय केले, असा सवाल करत आहे. यामुळे कोल्हापूरकरांची मात्र करमणूकच होत आहे. कारण, आरोप करणारे प्रत्येकजण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे महापालिकेच्या सत्तेशी संबधितच आहेत. मनपात सत्ता कोणाचीही असली, तरी राज्य आणि केंद्र सरकारकडून महापालिकेला निधी मिळत असतो. त्याद्वारे शहराचा विकास साधला जातो. यामुळे सध्या आरोप करणारे सर्वच जण या केंद्र आणि राज्य शासनात गेल्या दहा वर्षांपासून कमी-अधिक फरकाने सत्तेत होते तसेच आताही आहेत. मग, कोल्हापूरसाठी तुम्ही काय केले, या सवालाला काय अर्थ आहे, अशीही विचारणा कोल्हापूरकर करत आहेत.