

कोल्हापूर : बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचारासह कोलकाता येथील डॉक्टर महिलेसोबत घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी (दि. 23) कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. असे पत्रक सकल हिंदू समाजाचे निरंजन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे, संत महंत रामगिरी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मुस्लिम समाजाच्या आंदोलनावेळी एका वक्त्याने हिंदूंबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. याच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता रिक्षा, व्यापारी, व्यावसायिकांसह शाळा महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.