.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर : गणरायाच्या आगमन सोहळ्यात (Ganeshotsav 2024) व विसर्जन मिरवणुकांमध्ये लेसर आणि रंगीबेरंगी लाईटस् शो ची सध्या क्रेझ सुरू आहे. या मिरवणुकांमध्ये लेसर आणि साऊंड सिस्टीमच्या झापुकझुपूकवर तरुणाई बेभान होऊन थिरकत आहे. मात्र, मिरवणुकांमध्ये चोहोबाजूंनी फिरणारे लेसर आणि तीव्रक्षमतेच्या लाईटस् तुम्हाला कायमचे अंधःकारात घेऊन जाऊ शकतात. 5 वॅट क्षमतेच्या लेसरची किरणे केवळ दहा सेकंदासाठी जरी डोळ्यात पडली तर डोळ्यातील पडद्यात रक्तस्राव (रेटिनल हेमोरेज) होऊ शकतो. लेसर लाईटमुळे वर्षभरात 80 हून अधिक जणांवर उपचार करण्यात आल्याचे सीपीआरमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
मिरवणुकांमध्ये स्ट्रक्चवर लटकवलेले लेसर, लाईटस्, शार्पीची सध्या क्रेझ आहे. लाईटस् आणि लेसरच्या शोची झापुकझुपूक रील्सवर ट्रेंडिंगवर आहे. यामुळे प्रत्येक मंडळाकडून मिरवणूकीमध्ये लेसर आणि लाईट शो ची मागणी केली जात आहे. अनेकदा लेसर वापरताना उच्च क्षमतेचे लेसर वापरले जातात. या लेसरच्या आणि लाईट्स तीव्रतेमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. लेसरची किरने कॉन्सट्रेटेड असतात. ही किरणे थेट डोळ्याच्या आतील पडद्यामागे असणार्या रक्तवाहिन्यांवर पडतात. यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. रक्तस्राव झाल्यानंतर दृष्टी कमी होते, अंधुक दिसू लागते. यावर वेळीच उपचार न घेतल्यास दृष्टी जाण्याचा धोकाही असतो. (Ganeshotsav 2024)
गणेश चतुर्थीमुळे (Ganesh Chaturthi 2024) सध्या लेसरची मागणी वाढली आहे. शहरात 1 वॅट क्षमतेच्या लेसरचे चे भाडे सुमारे दीड हजार आहे. तर 10 वॅट क्षमतेच्या लेसरचे भाडे पाच हजार रुपयांपर्यंत आहे. 1 वॅटच्या लेसरची किरणे 100 मिटर पर्यंत दूर जाऊ शकतात. तर 10 वॅट क्षमतेच्या लेसरची किरणे 500 मिटरपर्यंत दूर जाऊ शकतात. सध्या 5 ते 10 वॅट क्षमतेचे लेसर गणेश मूर्ती आगमन सोहळ्यांमध्ये वापरले जात आहेत. आता अशांवर कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले.
लेसर व उच्च तीव्रतेच्या लाईटस् डोळ्यात पडल्यानंतर डोळ्यातून पाणी येणे, अंधारी येणे, जळजळ, काही काळ द़ृष्टी अंधूक होते. अशी लक्षणे दिसू लागल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
तीव्रक्षमतेच्या लेसरवर बंदी घातली पाहिजे. कमी क्षमतेचे लेसर वापरताना त्याचे डायरेक्शन हवेत असावेत. उच्च क्षमतेचे लेसर लाईट 10 सेकंदापेक्षा अधिककाळ डोळ्यात पडल्यास डोळ्याच्या पडद्याच्या मध्यबिंदूवर इजा होते व रक्तस्राव होण्याचा धोका असतो. यामुळे नजर कमी होते. असे जाणवू लागल्यास त्वरित नेत्रोपचार तज्ञांचा सल्ला घ्याव.
- डॉ. अभिजीत ढवळे, नेत्ररोग तज्ञ, सीपीआर