

Bambavde Stray Dog Leopard Attack
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे भरदिवसा बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. मध्यवर्ती मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्याच्या वेळी बिबट्या अगदी समोर आल्याने घरातील महिला थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
बांबवडे-कोकरूड रस्त्यालगत आनंदा दिलीप निकम यांचे घर आहे. मंगळवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास घराच्या मागील बाजूस अचानक बिबट्या आला. त्याने निकम यांच्या पाळीव कुत्र्यावर झडप घातली. यावेळी घरात असलेल्या निकम यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने कुत्र्याला सोडून तेथून धूम ठोकली.
मात्र, पाच ते दहा मिनिटांनी बिबट्या पुन्हा त्याच ठिकाणी आला. जखमी कुत्र्याला उचलून त्याने शेजारील उसाच्या शेतात धूम ठोकली. याचवेळी निकम यांच्या पत्नीच्या अगदी समोर बिबट्या आल्याने त्या घाबरल्या. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी आरडाओरडा करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
निकम यांच्या कुटुंबात दोन लहान मुले तसेच आई-वडील राहतात. त्यामुळे मानवी वस्तीतच बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे लहान मुलांना घराबाहेर पाठवणे, तसेच शेतात जाणे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.
बांबवडे परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही वनविभागाकडे केल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतरही वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
‘या भागात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी आम्ही वारंवार वनविभागाकडे केल्या आहेत. मात्र, अद्याप पिंजरा लावण्यासह कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वनविभाग एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?’ असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
बांबवडे व परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि रात्रीच्या वेळी वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भरवस्तीत भरदिवसा बिबट्याचा वावर आढळून आल्याने बांबवडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभाग आता तरी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.