Kolhapur Ambabai Temple : दीड लाख भाविक अंबाबाई चरणी

Kolhapur Ambabai Temple :  दीड लाख भाविक अंबाबाई चरणी
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या दिवशी, सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, सोमवारी देवीची महागौरी रूपात, तर दख्खनचा राजा श्री जोतिबाची सोहम कमळ पुष्पातील पूजा बांधण्यात आली होती.

सोमवारी औद्योगिक सुट्टीमुळे अंबाबाई देवीसह जुना राजवाड्यातील तुळजाभवानी तसेच करवीरातील नवदुर्गा आणि विविध देवी-देवतांच्या मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. वाहने मोठ्या संख्येने शहरात आल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांसह महाविद्यालयीन विद्यार्थी व पोलिसमित्र गर्दीच्या नियोजनात सक्रिय होते. अंबाबाई मंदिराकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवर दुतर्फा वाहने लागली होती. दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आज देवीचे दर्शन घेतले. रात्री पालखी सोहळा उत्साहात झाला. एक शिखर आकारात पालखी सजविण्यात आली होती.

अंबाबाईची महागौरी रूपात पूजा

आश्विन शुद्ध द्वितीयेला (दि. 16) अंबाबाईची महागौरी रूपात पूजा बांधली होती. दुर्गासप्तशतीअंतर्गत श्री ब—ह्मदेव आणि मार्कंडेय ऋ षी यांच्यातील संवादाप्रमाणे नवदुर्गांपैकी दुर्गेच्या आठव्या रूपाचे नाव महागौरी आहे. महागौरी पूर्णतः गौर वर्णाची असून, तिच्या वर्णाची तुलना शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांशी करता येईल. 'अष्टवर्षा भवेद गौरी' अर्थात तिचे वय आठ वर्षे मानले जाते. सर्व वस्त्रालंकार श्वेत वर्णाचे आहेत. ती चतुर्भुजा देवी आहे आणि वाहन वृषभ आहे. उजव्या वरच्या हातात अभय मुद्रा, उजव्या खालच्या हातात त्रिशूळ, वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात वरमुद्रा आहे. ही पूजा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व पुजारी आनंद मुनिश्वर, किरण मुनिश्वर, चैतन्य मुनिश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.

सांस्कृतिक कार्यक्रम

दुपारपासून स्वामी ओम स्वर तरंग सासने कॉलनी, वीरशैव अक्कमहादेवी, समर्थ महिला मंडळ कराड, स्वामी समर्थ महिला मंडळ नसरापूर, पुणे यांची भजन सेवा झाली. सायंकाळी भक्तिभाव गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. मंगळवारी स्वामी समर्थ महिला मंडळ-शाहूमिल, ज्ञानाई सांस्कृतिक-नवी मुंबई, स्वरगंधी संगीत विद्यालय-बेळगाव, त्रिमूर्ती महिला मंडळ-कोल्हापूर, हनुमान दत्तपंथी सुरेल संगीत भजन यांचे कार्यक्रम होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news