कोल्हापूर विमानतळ जगाच्या हवाई नकाशावर

कोल्हापूर विमानतळ जगाच्या हवाई नकाशावर

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी आता स्वत:चा हवाई मार्ग (एरियल रूट) मिळणार आहे. याकरिता 'डीव्हीओआर' (डॉपलर व्हीएचएफ ओमनीडायरेक्शन रेंज) ही प्रणाली विमानतळावर बसविण्यात येत आहे. 15 मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचबरोबर 'आरएमपी' या उपग्रहावर आधारित दिशादर्शक प्रणालीला मान्यता मिळाली असून, ती 13 जूनच्या मध्यरात्रीपासून कार्यान्वित होणार आहे. या दोन्ही प्रणालींमुळे विमान प्रवास अधिक सुरक्षित होणार असून, यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. परिणामी, कोल्हापूरची विमानसेवा विस्तारण्यासाठीही याचा मोठा फायदा होणार आहे.

कोल्हापूर विमानतळावर 'डीव्हीओआर' आणि 'डीएमई' प्रणाली बसविण्यात येत आहेत. हे काम 15 मेपर्यंत पूर्ण होईल. यानंतर महिना-दोन महिन्यांत ही प्रणाली प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. कोल्हापूर विमानतळासाठी 'आरएमपी' (रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मस) या सॅटेलाईटवर आधारित प्रणालीला सलग दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे. या प्रणालीनुसार कोल्हापूरसाठी स्वतंत्र चॅनेल क्रमांक निश्चित झाला असून, त्यानुसार कोल्हापूरसाठी 'इन्स्ट्रूमेंटल अ‍ॅप्रोच चार्ट' तयार झाला आहे. यामुळे कमी द़ृश्यमानतेतही विमानतळावर सुरक्षित लँडिंग करता येणार आहे. याखेरीज 'आयएलएस' (इन्स्ट्रूमेंटल लँडिंग सिस्टीम) प्रणालीलाही कोल्हापूरसाठी मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे 'डीव्हीओआर'?

'डीव्हीओआर' ही आधुनिक दिशादर्शक प्रणाली आहे. विमानतळावर बसविण्यात आलेल्या मोठ्या रडारद्वारे उत्तर दिशा ही शून्य अंशात निश्चित केली जाते. त्यापुढील 360 अंशांत प्रत्येक अंशानुसार एक असे सुमारे 360 मार्ग (रूट) तयार करता येतात. त्यातून दोन विमानतळांवरील 'डीव्हीओआर' प्रणालीने एक स्वत:चा रूट तयार करता येतो. पायलटला रूट शोधत शोधत यावे लागत नाही.

काय आहे 'डीएमई'?

'डीएमई' म्हणजे 'डिस्टन्स मेजरिंग इक्विपमेंट.' याद्वारे धावपट्टीचे नेमके अंतर समजण्यास पायलटला मदत होते. यामुळे कमी द़ृश्यमानतेतही विमान उतरवता येणार आहे. सध्या दोन विमानांच्या मध्ये, उतरण्यासाठी किमान 8 मिनिटांचा वेळ लागतो. तो कमी होणार आहे. यामुळे विमाने हाताळण्याची क्षमता वाढणार आहे.

'आरएमपी' म्हणजे काय?

'इस्रो' आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने 'गगन' ही सॅटेलाईट बेस सुविधा निर्माण केली आहे. त्याकरिता रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मस (आरएमपी) ही प्रणाली वापरली जाते. त्याद्वारे विमानातून दिल्या जाणार्‍या सिग्नलवर धावपट्टीचे नेमके अंतर, नेमकी दिशा काय हे पायलटला स्पष्ट होणार आहे. सध्या 'एनडीबी' तंत्राचा वापर करून कोल्हापूर विमानतळावर विमान परिचालन होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news