माध्याळ : नंद्याळ (ता.कागल) येथील (सी. आय. आर. एफ.) जवान रमेश पांडुरंग कुणकेकर यांच्या निधनानंतर अवघ्या दोनच दिवसांनी त्यांच्या मातोश्री शांताबाई कुणकेकर (वय 75) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. जवान कुणकेकर यांचे सोमवार, दि.26 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने जामनगर गुजरात येथे निधन झाले होते.
मायलेकरांच्या पाठोपाठ झालेल्या निधनाने कुणकेकर कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेली 32 वर्षांपासून कुणकेकर कुटुंब नोकरी निमित्त गुजरातमध्ये स्थायिक झाले होते. आई आजारी असल्याने जवान रमेश कुणकेकर नंद्याळ गावी काही दिवसांपूर्वी आले होते. आईची सेवा करून ते पुन्हा सेवेत गुजरातला परतले.
वयोवृद्ध आईच्या सेवेची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांनी पत्नीला सेवेसाठी आईसोबत ठेवले होते.पण, अवघ्या दोन दिवसांत माय- लेकरांच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांच्या मागे सुना, नातवंडे असा परिवार आहे.