

हुपरी पुढारी वृत्तसेवा :
मोटारसायकलचे पंक्चर काढल्यानंतर सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन तरुणासह दोघांनी गिरीष विश्वनाथ पिल्लाई (वय 47, सध्या रा.यळगुड मुळ राहणार उमानूर जि. कोलम केरळ) याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी नचिकेत विनोद कांबळे, (वय १९ वर्षे) रा. शिंगाडे गल्ली, शाहुनगर हुपरी, ता. हातकणंगले याच्यासह अल्पवयीन बालकास अटक केली आहे. हुपरी पोलीसांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
याबाबतची अधिक माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी आज दिली. गुरुवार दि 29 रोजी रात्री ही घटना घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, जवाहर पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या पंक्चर दुकानात नचिकेत व त्याचा मित्र मोटारसायकल पंक्चर झाली म्हणून आले होते. दुकान बंद केल्यानंतर हे दोघे आले तरीही गिरीष पिल्लाई याने त्यांना पंक्चर काढून दिले. त्यानंतर या तरुणांनी त्यांना पाचशे रूपय दिले, मात्र पिल्लाई याने सुट्टे पैसे नाहीत आणून द्या असे सांगितले. त्यामुळे या तिघांत वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात जोरात भांडण झाले. यावेळी नचिकेत याने चिडुन तेथील लोखंडी पाना [टॉमी] घेवुन पिल्लाईच्या डोकीत, तोंडावर मारली तसेच अल्पवयीनाने त्याच्याकडील चाकु घेवुन पिल्लई याच्या पोटावर मारुन त्यास गंभीर जखमी करुन ठार मारले असे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत अपर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक एन.आर.चौखंडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे रविंद्र कळमकर. शेष मोरे. प्रसाद कोळपे, अशोक चव्हाण, रावसाहेब हजार, पोलीस कॉन्स्टेबल मांडवकर, कांबळे, चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल कोले, कांबळे, उदय कांबळे, एकनाथ भांगरे, सत्तापा चव्हाण, शेटे, दर्शन धुळे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.