कोल्हापूर: गजापूर येथील शाळा इमारतीच्या दुरूस्तीसाठी ६ लाखांचा निधी; कामाला सुरूवात

कोल्हापूर: गजापूर येथील शाळा इमारतीच्या दुरूस्तीसाठी ६ लाखांचा निधी; कामाला सुरूवात


विशाळगड: गजापूर (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक शाळेत साचले पाणी, विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान' या मथळ्याखाली 'दै पुढारी'ने आठवडाभरापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत गजापूर येथील बाजीप्रभू प्राथमिक शाळेच्या इमारत दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून सहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, शाळा इमारत दुरूस्तीस आज (दि १४) शिंदे  गटाचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांच्या हस्ते प्रारंभ केला. यावेळी उपतालुका प्रमुख निखील नारकर व जिल्हा उपप्रमुख गणेश चौगुले, माजी सरपंच संजयसिंह पाटील उपस्थित होते.

गजापूर येथील शाळेचे बांधकाम १९२० मधील आहे. सात वर्गातील ५८ विद्यार्थी चार खोलीत शिक्षण घेत आहेत. जुनी इमारत आणि छताला लागलेल्या गळतीमुळे खोल्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. दरवर्षीच्या गळतीमुळे शाळा मोडकळीस आली आहे. पावसामुळे खोल्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. इमारतीची दुरवस्था, छताची गळती आदी कारणांमुळे शाळा दुरुस्त होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता.

'दै पुढारी'ने 'गजापूर शाळेत साचले पाणीच पाणी' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त २९ जुलैरोजी प्रसिद्ध केले होते. शाळा व्यवस्थापन समितीने आवाज उठवत आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता. शिक्षण विभागाचे बांधकाम अभियंता अमित पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा सुतार, केंद्रप्रमुख राजेंद्र लाड यांनी तातडीने सर्वे करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. येथील तीन वर्ग खोल्याचे रूपकाम, खिडक्या, दरवाजे, फरशी दुरूस्ती तसेच वीज फिटींग, पंखे नव्याने जोडण्यात येत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून गजापूर पैकी साईनाथ पेठेतील दोन खासगी घरात या मुलांचे ज्ञानार्जनाचे काम सुरू आहे. येथील युवा सेना शाहूवाडी तालुका उपप्रमुख निखिल नारकर यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे शाळा दुरुस्तीबाबत पाठपुरावा करून जिल्हा नियोजन फंडातून ६ लाख मंजूर करून घेतले आहेत. वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाला जाग आणल्याने 'दै पुढारी'चे कौतुक व अभिनंदन होत आहे. याप्रसंगी राहुल तोडकर, काशिनाथ नारकर, यशवंत कांबळे, एच. एस. पाटील, शिक्षक, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

उद्घाटन प्रसंगी राकेश खोंद्रे म्हणाले की, दुर्गम व प्रकल्पग्रस्त भागातील या शाळेच्या अन्य दोन खोल्यांच्या दुरूस्तीसह, अंगणवाडी इमारत व संरक्षण भिंत उभारणीसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करण्यास सेना संघटना पुढाकार घेईल.
– राकेश खोंद्रे, युवा सेना, जिल्हा प्रमुख

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news