ramesh deo : ये लडका काम का हैं… नाम रोशन करेगा!

कोल्हापूर : थर्ड आय फिल्म फेस्टिव्हलच्या वतीने रमेश देव व सीमा देव यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत जोशी, सुमित्रा भावे, त्यागराज पेंढारकर, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : थर्ड आय फिल्म फेस्टिव्हलच्या वतीने रमेश देव व सीमा देव यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत जोशी, सुमित्रा भावे, त्यागराज पेंढारकर, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.
Published on
Updated on

'ये लडका काम का हैं… बडा होके नाम रोशन करेगा…' हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता-दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांनी केलेले भाकित आपल्या अभिनयाने खरे करून दाखवले ते रमेश देव (ramesh deo) यांनी. 300 हून अधिक हिंदी, 200 हून अधिक मराठी व 30 नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचे अनेक पैलू उलगडलेल्या रमेश देव यांचे बुधवारी निधन झाले. (ramesh deo)

रमेश देव यांचा जन्म वर्धा येथे झाला; पण त्यांचे बालपण कोल्हापुरातच गेले. शालेय शिक्षण विद्यापीठ हायस्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. करवीर नगर वाचन मंदिराजवळ त्यांचा वाडा होता. अनेक वर्षे येथे त्यांचे वास्तव्य होते.

कोल्हापूरच्या जुन्या पेठांमध्ये व पंचगंगा तीरावर सवंगड्यांसोबत रमेश देवही कोल्हापुरात चांगलेच रमले होते. वडील व्यवसायाने वकील होते. त्यांचे व भालजी पेंढारकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. जयप्रभा स्टुडिओत तेव्हा 'वाल्मिकी' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. पृथ्वीराज कपूर यांना तांबडा- पांढरा रस्सा आवडायचा. भालजींना मटणाचे जेवण घेऊन रमेश देव यांच्या वडिलांना बोलावले होते. तेव्हा रमेश देवही त्यांच्यासोबत होते. चित्रपटात बालकलाकाराची भूमिका करणारा कलाकार आला नव्हता. चित्रीकरण थांबणार याची भालजी पेंढारकर यांना चिंता होती. तोच पृथ्वीराज कपूर यांची नजर रमेश देव यांच्यावर पडली. त्यांनी भालजींना सांगितले, 'इस लडके को ले लो… ये लडका काम का हैं… इसकी नजर और अंदाज मुझे पसंद आया…', भालजींनी रमेश देव यांना काम करणार का, असे विचारताच त्यांनी होकार दिला आणि एका नव्या कलाकाराचा उदय झाला.

रमेश देव यांना नंतर मराठी नाटकांची आवड निर्माण झाली. शाळेत तसेच महाविद्यालयात त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. 1950 मध्ये मधुकर कुलकर्णी यांना ते आपले गुरू मानत. त्यांच्या अनेक नाटकांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या. याचवेळी दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी 'रमेश तू कोल्हापुरात थांबू नकोस, मुंबईत जा' असा सल्‍ला दिला आणि त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला.

बालपण कोल्हापुरात

रमेश देव यांचे मूळ राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. त्यांचे वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब कोल्हापुरात आले. रमेश देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे आडनाव 'देव' झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले. रमेश देव यांचे आजोबा इंजिनिअर होते. त्यांनी जोधपूरच्या महालाचे बांधकाम केले होतेे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांना कोल्हापूरला बोलवून घेतले आणि जोधपूरसारखाच राजवाडा शाहू महाराज यांनी कोल्हापुरात बांधण्यास सांगितला. सीमा या पूर्वाश्रमीच्या कर्नाटकातील नलिनी सराफ, तर रमेश देव मूळचे राजस्थानी; पण ही जोडीकोल्हापूरच्या मराठी मातीत अस्सल मराठीच म्हणून राहिली.

राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न

चित्रपटांबरोबरच रमेश देव यांनी राजकारणातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. 1996 मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार उदयसिंह गायकवाड यांच्या विरुद्ध ते उभे होते. या निवडणुकीत गायकवाड विजयी झाले. गायकवाड यांना 2 लाख 36 हजार 739 मते मिळाली. रमेश देव यांना 1 लाख 68 हजार 414 मते मिळाली.प्रा. एन. डी. पाटील यांना 1 लाख 17 हजार 163 मते मिळाली होती.

रांगडा कलाकार हरपला : भालचंद्र कुलकर्णी

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेला कोल्हापूरचा रांगडा कलाकार हरपला, असे भालचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्‍त करताना सांगितले. कोल्हापुरातील फारच कमी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवले आहे. कलेची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना स्वत:च्या हिंमतीवर रमेश देव यांनी चित्रपट सृष्टीत आपले नाव कमावले.

अभिनय, माणुसकीतील देव : चंद्रकांत पाटील

ज्येष्ठ अभिनेते, कोल्हापूरचा अभिमान रमेश देव अभिनय आणि माणुसकीमधील ते खरे देवच होते. अत्यंत बोलका चेहरा, संवेदनशील मन आणि समाजाप्रती संवेदनशीलता ही त्यांची ओळख होती. देखण्या रमेश देव यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होतीच; पण कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रातही त्यांची आठवण कायम असणार आहे. एका मोठ्या मनाच्या व्यक्‍तिमत्त्वाला आज आपण मुकलो आहोत, अशा भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news