

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
खिद्रापूर (ता. शिरोळ) व परिसरात बोकड-शेळी चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बोकडांना मोठी मागणी असून त्याच पार्श्वभूमीवर ही टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
एका संशयिताला
गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.मात्र, सबळ पुरावे नसल्याचे कारण देत त्याला सोडण्यात आले. विशेष म्हणजे, त्याच संशयिताकडून पुन्हा चोरी झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बोकड चोर टोळीने रात्रीच्यावेळी हत्यारांसह येऊन घरांना बाहेरून कड्या लावून जनावरांवर विशिष्ट स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध करून चोरून नेले आहे. ग्रामपंचायत सदस्य इर्शाद मुजावर यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेत नंबर प्लेट काढलेल्या होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून आलेले संशयित सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पाजत असताना हे , शस्त्रबंद असलेले चोरटे एका शेतकऱ्याचे निदर्शनास आले त्यांनी विचारपूस केली असता दिशाभूल केली.
खिद्रापूर येथील शकील आलासे यांची 2 बोकड,, इर्शाद मुजावर यांचे 1 बोकड,साजिद घुणके यांचे 2 बोकड तसेच अकिवाट व राजापूरवाडी परिसरातही 6 बोकड आणि 7 शेळ्या अशी सुमारे 3 लाखाची जनावरे चोरून नेली आहेत.