

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीपात्रामध्ये सुमारे १० फूट लांबीच्या दोन मगरींचा वावर आढळून आल्याने शेतकरी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसरासमोर तसेच रायनाडे मळ्याजवळ या मगरी दिसून आल्या आहेत.
शनिवारी (दि.१८) सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास खिद्रापूर-जुगुळ पूलापासून घाटाच्या दिशेने मगर जात असल्याची पुलावरील युवकांना निदर्शनास आली, तर रायनाडे यांच्या शेतालगत मगर काठावर येऊन बसल्याची राहुल रायनाडे या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. यामुळे शेतकरी वर्गात मगरींची दहशत पसरली आहे.
पर्यटकांनी घाट परिसरात जाऊ नये, सावधगिरी बाळगावी तसेच नदीकाठ परिसरात जाणे टाळावे, असे ग्रामपंचायत प्रशासनाने आवाहन केले आहे. कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांमधील पाणीपातळी सध्या कमी झाल्याने मगरींचा वावर वाढला आहे. वन विभागाने याची तातडीने दखल घेऊन संबंधित मगरींचा बंदोबस्त करावा व त्यांना सुरक्षित अधिवासात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.