

Khidrapur Kopeshwar Temple News
कुरुंदवाड : जमीर पठाण
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील प्राचीन आणि भव्य कोपेश्वर मंदिरात आज (सोमवार) सकाळी सूर्योदयाच्या सुमारास एक अद्वितीय खगोलीय घटना किरणोत्सव अनुभवायला मिळाला. सकाळी नेमक्या ६ वाजून २७ मिनिटांनी सूर्योदयाच्या किरणांनी मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगावर अभिषेक केला. हे दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेमुळे मंदिरातील सुंदर वास्तुशिल्प आणि भौमितिक संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. कोपेश्वर मंदिराची रचना इतकी अचूक आहे की, विशिष्ट दिवसांवर सूर्याच्या किरणांचा प्रवास सरळ गर्भगृहात जाऊन देवतेवर पडतो. ही घटना वर्षातून दोन वेळा होते, ज्यातून मंदिराचे प्राचीन विज्ञान आणि स्थापत्यकलेतील निपुणता सिद्ध होते.
याच दिवशी दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास आणखी एक दुर्लभ खगोलीय घटना शून्य सावली दिवस (Zero Shadow Day) अनुभवायला मिळणार आहे. या वेळी सूर्य पृथ्वीवर अशा बिंदूपर्यंत येतो की, तो नेमका डोक्यावर असतो, त्यामुळे जमिनीवर कोणत्याही वस्तूची सावली दिसत नाही.
ही घटना दरवर्षी केवळ दोनदाच घडते, ती फक्त कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान येणाऱ्या भागातच दिसते. शून्य सावली दिवस हा सूर्याच्या भासमान उत्तरायण आणि दक्षिणायन मार्गामुळे घडतो. या वेळी सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील कोनीय व्यासाचे अंश अचूक जुळतात आणि त्यामुळे सावली निर्माण होत नाही.
खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थळ आहे. हे मंदिर चालुक्य कालीन असून त्याची स्थापत्यकला, शिल्पकला, आणि खगोलशास्त्रीय नेमकेपणा हे भारतीय प्राचीन ज्ञानशाखांचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या दर्शनी भागातील नक्षीकाम, गर्भगृहाच्या अचूक दिशाभोवतीचे नियोजन आणि अशा खगोलीय घटनांचे पूर्वानुमान दर्शवणारी रचना हे सर्व घटक पर्यटक आणि संशोधकांना मोहून टाकणारे आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे कोपेश्वर मंदिराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.