

कोल्हापूर : अंध व्यक्तींच्या डोळ्याचे काम ब्रेल लिपी करते. अशा या ब्रेल लिपीतून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रजाहितदक्ष राजवटीची माहिती मिळणार आहे. ब्रेल लिपीतील राजर्षी शाहू माहिती पुस्तिकेची निर्मिती कोल्हापुरात करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावर आधारित ब्रेल लिपीमध्ये छपाई करण्यात आलेली ही पहिलीच पुस्तिका आहे.
लुई ब्रेलने विकसित केलेली स्पर्शिक लेखन प्रणाली म्हणजेच ब्रेल लिपी. द़ृष्टिहीन व्यक्तींमध्ये संवाद, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी ही लिपी शक्तिशाली साधन आहे. या साधनाचा वापर करून लोकराजा राजर्षी शाहू कार्याची माहिती अंध व्यक्तींना मिळावी, या उद्देशाने न्यू कॉलेज (इ. 12 वी, सन 2006) आणि व. ज. देशमुख हायस्कूल (इ. 10 वी , सन 2004) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी या पुस्तिकेची निर्मिती केली आहे.
ही संकल्पना राजर्षी शाहू विचार अभ्यासक विक्रम रेपे यांची असून, ब्रेल लिप्यंतर व मुद्रण रायगड येथील स्वागत थोरात यांनी केले आहे. मजकूर निवड व पडताळणीसाठी पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके यांचे सहकार्य लाभले आहे. माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक भान राखत मदत स्वरूपात जमा केलेल्या रकमेतून पुस्तिकेचे मुद्रण केले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अंध संस्था व शाळा, महाविद्यालयांत पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
या पुस्तिकेचे लोकार्पण राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनी होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागाच्या सहकार्याने मंगळवार, दि. 6 मे रोजी दुपारी साडेचार वाजता, व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात खा. शाहू महाराज यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे , इतिहास विभाग प्रमुख अवनिश पाटील, पुराभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडकेयांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.