कवठेसारचे ‘ग्रामसेवक’ लाचलुचपतच्या जाळ्यात

कवठेसारचे ‘ग्रामसेवक’ लाचलुचपतच्या जाळ्यात

शिरोळ, पुढारी वृत्तसेवा : घरकुल योजनेअंतर्गत घर बांधकाम करणाऱ्या चार मजुरांची शासनाकडून रक्कम मंजूर करून घेतली. आणि घरकुलाचे थकीत अनुदान ग्रामसेवक यांच्याकडून काढून देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंटर विशाल शंकर पाटील ( वय 29, रा. धरणगुत्ती ता. शिरोळ ) व अनुमती देणारे तत्कालीन ग्रामसेवक हेमंत मधुकर जाधव (वय 32, रा. पाटील मळा इंचलकरंजी, सध्या नेमणुक, कवठेसार ग्रामसेवक ) या दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. गारगोटी पाठोपाठ दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकावर कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कारवाईची माहिती समजून आल्यानंतर तालुका पंचायत समिती, ग्राम विस्ताराधिकारी विभागासह ग्रामसेवक पातळीवर दबावाचे चित्र दिसून येत होते. लाचलुचपत विभागाने ही कारवाई हरोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर केली. तक्रारदार यांनी जांभळी (ता. शिरोळ) येथे घरकुल योजनेतून घर बांधकाम केले आहे. या बांधकामावरील मजुरांच्या पगाराची रक्कम शासनाकडून मंजूर करून घेतली आहे. या कामासाठी स्वतःला 5 हजार रुपये आणि दुसरा हप्त्याचे अनुदान काढून देण्यासाठी ग्रामसेवक हेमंत जाधव यांना 2 हजार रुपये अशी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी विशाल पाटील यांनी केली होती.

दरम्‍यान, ही रक्कम स्वीकारण्यासाठी ग्रामसेवक जाधव यांनी अनुमती दिली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून विशाल पाटील याला हरोली येथे 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर लाचेतील रक्कम घेऊन जाण्यासाठी ग्रामसेवक जाधव यड्राव फाट्यावर आले असता लाचलुचपत विभागाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, पो.हे.कॉ. अजय चव्हाण, पो.ना.विकास माने, पो.ना.नवनाथ कदम, पो.ना.सुनील घोसाळकर, पो.ना.कृष्णात पाटील यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news