

कोल्हापूर : बनावट सोने तारण देऊन करूर वैश्य बँकेच्या राजारामपुरी शाखेची 83 लाख 36 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या पॅनेलवरील सराफ दीपक गोपाळ देवरूखकर याच्यासह 7 जणांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला.
12 जुलै ते 4 नोव्हेंबर 2025 या चार महिन्यांत हा प्रकार घडला. गहाणवट जिन्नसाचे मूल्यांकन करून व ते जिन्नस अस्सल असल्याबाबत वजनासह लेखी दाखला देऊन संशयितांनी बँकेची संगनमताने फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यात सराफ व्यावसायिकासह सुरेखा सुरेश डावरे (रा. रणदिवे गल्ली, महादेव मंदिरजवळ, कसबा बावडा, कोल्हापूर), दीपा दीपक देवरूखकर (डी. एस. कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ), संग्राम भीमराव पाटील (रणदिवे गल्ली, कसबा बावडा), आराध्या बाळासाहेब जाधव (जाधव गल्ली, रेंदाळ, ता. हातकणंगले), संजय दत्तात्रय पिसाळे (मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर), विक्रम अशोक डंबे (मंडलिक गल्ली, चौंडेश्वरी हॉलजवळ, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
करूर वैश्य बँकेच्या राजारामपुरी शाखेचे व्यवस्थापक नीरज शिवाजी देशमुख (38, रा. कारंडे मळा, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी सराफ देवरूखकरसह 7 जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, देवरूखकर हे बँकेच्या पॅनेलवरील अधिकृत सराफ व्यावसायिक आहेत. मे 2011 पासून ते बँकेचे काम पाहात आहेत. ग्राहकांनी तारण म्हणून दिलेल्या सोने जिन्नसची अस्सलता, सत्यता तपासून त्याचे वजन करून योग्य मूल्यांकन करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असताना अन्य संशयितांना हाताशी धरून खोटे जिन्नस अस्सल असल्याचा दाखला दिल्यानंतर बँकेने संशयितांची सहा कर्ज प्रकरणे मंजूर करून रकमा अदा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.