

शिरगाव : पिलारवाडी (ता. राधानगरी) येथील ट्रकाचा भांग नावाच्या शिवारात बिथरलेल्या गव्याने चांगलाच धुडगूस घातला. गव्याने चढवलेल्या जोरदार हल्ल्यात म्हैस गंभीर जखमी झाली. दैव बलवत्तर म्हणून एक महिला व दोन पुरुष सुखरूप बचावले.
शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शामराव आण्णाप्पा डकरे यांच्या म्हशीवर गव्याने हल्ला चढवला. गवा व म्हैस यांच्या झुंजीत या गव्याने पोटात शिंगे खुपसल्याने म्हैस गंभीर जखमी झाली. ग््राामस्थांचा आरडाओरडा ऐकून गव्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या गव्याने सकाळी शेताकडे निघालेल्या श्रीपती कृष्णा डवर, श्रीपती रामचंद्र पिलावरे व गौरा धनाजी पिलावरे यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण ते थोडक्यात बचावले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत आलेले पशुवैद्यकीय अधिकारी जयेश लोकरे यांनी जखमी म्हशीवर उपचार केले. शस्त्रक्रिया करून म्हशीचा जीव वाचवला. या घटनेनंतर घटनास्थळी अनेक शेतकऱ्यांनी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावण पसरले असून गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.