काळम्मावाडीची गळती सरकारची डोकेदुखी वाढविणार?

काळम्मावाडीची गळती सरकारची डोकेदुखी वाढविणार?
Published on
Updated on

[author title="प्रवीण ढोणे" image="http://"][/author]

राशिवडे : पाणी साठवण क्षमता 28 टीएमसी असणारे आणि राज्यातील 11 क्रमांकावर असणारे काळम्मावाडी धरण आता गळतीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले आहे. धरणाची गळती पाचपटीने वाढल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. गळती कामासाठी 80 कोटींचा निधी मंजूर झाला असून, वेळेत गळती काढण्याच्या कामास सुरुवात न झाल्याने पाणी साठवणही कमी होणार असल्याने शेतकर्‍यांनी ऊस क्षेत्रही घटविले आहे. याचा आर्थिक त्रास शेतकर्‍यांसह कारखान्यांना होणार आहे.

1999 मध्ये काम पूर्ण झालेल्या काळम्मावाडी धरणाची लांबी 1350 मीटर असून, दगडी बांधकाम 490 मीटर आहे. सुरुवातीलाच या धरणाला 398 लिटर प्रतिसेकंद गळती सुरू झाली. ही गळती थांबविण्यासाठी 5 कोटी 74 लाख रुपये खर्च झाले. आता ही गळती पाचपटीने वाढल्याने चिंता वाढली आहे. सुरुवातीला 398 लिटर प्रतिसेकंद असणारी गळती 2015 मध्ये प्रतिसेकंद 90 लिटरपर्यंत आली. त्यानंतर मात्र गळतीत वाढ झाली. केंद्रीय जल, ऊर्जा संशोधन केंद्राने धरणाच्या विविध चाचण्या घेतल्यानंतर सुरुवातीपेक्षा पाच पटीने वाढल्याचा निष्कर्ष सरकारसमोर ठेवला. त्यामुळे पुन्हा धरण पूर्णक्षमतेने भरणे धोकादायक असल्याने 5 ते 6 टीएमसीने कमी पाणीसाठा केला जातो.

जिल्ह्यातील 21 गावांमधील 41 हजार हेक्टर क्षेत्राचे भवितव्य या धरणावर अवलंबून आहे. मुळातच क्षमतेपेक्षा होणारा कमी पाणीसाठा, कर्नाटकची पाणी वाटणी, गैबी बोगद्यातून भोगावती नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी, थेट पाईपलाईनमधून कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा, त्यात पिण्याच्या पाण्याचा वाटा व उरलेल्या पाणीसाठ्यातून सिंचनासाठी मिळणारा वाटा यामध्ये मोठी तफावत वाढू लागल्याने शेतकर्‍यांनी ऊस पीक घेण्याची मानसिकता बदलली. त्यामुळे ऊस क्षेत्रही घटले. याचा आर्थिक तोटा कारखान्यांसह शेतकर्‍यांना बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news