

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्यात संपूर्ण आटलेला कळंबा तलाव शनिवारी तुडुंब भरला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तलाव भरून ओसंडून वाहू लागल्याने बघ्यांची गर्दी झाली. शहरातील मंगळवार पेठेसह त्या परिसराला याच तलावातील पाणी पिण्यासाठी पुरविण्यात येते. आता तलाव भरल्याने पाण्याचा प्रश्नही मिटला. तलावातील पाणी पातळी कमी झाल्याने अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात आला होता. त्यावरून या तलावाचे महत्त्व अधोरेखित होते.
कळंबा तलाव 1883 मध्ये बांधला आहे. तलावाचा जलाशय 93.13 हेक्टरमध्ये आहे. पाणी साठवण क्षमता 2.758 टी.एम.सी. इतकी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा तलाव कोल्हापूरकरांची तहान भागवत आहे. त्यासाठी साडेतीन किलोमीटर लांब 450 मि. मी. व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. रोज 8 ते 9 एम. एल. डी. पाण्याचा वापर करण्यात येतो. कालांतराने शहरासाठी बालिंगा, नागदेववाडी, कसबा बावडा, शिंगणापूर योजना अस्तित्वात आल्या. त्यानंतर फक्त मंगळवार पेठेसह त्या परिसरात कळंबा तलावातून पाणी पुरवठा होऊ लागला.
यंदा पावसाळा लांबल्याने कळंबा तलावातील पाणीपातळी अत्यंत खालावली होती. जूनअखेरीस तर तलाव पूर्ण आटला होता. त्यामुळे उपसा बंद झाल्याने मंगळवार पेठेतील पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली. परिणामी, 19 जूनपासून शिंगणापूर उपसा केंद्रातून मंगळवार पेठेसह इतरत्र पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला. त्यामुळे कोल्हापूर शहरात तेव्हापासून दिवसाआड पाणी पुरवठा होऊ लागला. कळंबा तलावातील पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर उपसा सुरू करण्यात आला. त्यानंतर 24 जुलैपासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला.