

Overflow Warning
विशाळगड : निनाई परळे ता शाहुवाडी येथील कडवी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे, ज्यामुळे कडवी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या सांदव्यातून ११० क्यूसेस तर विद्युत गृहातून २४० क्युसेस असे एकूण ३५० कयुसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी कडवी नदीपात्रात सोडले जात असून, पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी ही माहिती दिली.
यापूर्वीच कडवी धरण पूर्ण भरले असते, परंतु पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने पाणीपातळी ९९ टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवली होती. संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आणि गुरुवारी (दि. २४) सकाळी ७ वाजता कडवी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला.
कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१५ टीएमसी असून धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या २४ तासांत ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात १८५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या २०६६ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ६०१.२५ मीटर असून, पाणीसाठा ७१.२४० दलघमी इतका आहे. धरणात ५४७ क्युसेस पाण्याची आवक होत आहे.
कडवी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे कडवी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेने पर्यटकांना येणेस बंदी आहे.
खंडेराव गाडे, शाखा अभियंता, कडवी धरण