Jowar Price Hike | ज्वारीने पार केली शंभरी... हॉटेलात २५ रुपयाला झाली भाकरी!

कोल्‍हापुरात भाकरीचा दर वाढला : उच्च प्रतीचा शाळू, ज्वारी किलोचा दर १२० रुपयांवर; दोन आठवड्यांत १५ ते २० रुपयांची वाढ : ५० वर्षांनंतर दर १०० पुढे
हॉटेलात चुलीवरच्‍या भाकरीला मोठी मागणी आहे.
हॉटेलात चुलीवरच्‍या भाकरीला मोठी मागणी आहे. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : दुष्‍काळामुळे आवक घटल्याने रोजच्या आहारातील महत्त्वाचे अन्न असलेल्या ज्वारीच्या दराने कोल्हापूरच्या धान्य बाजारात नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच उच्च प्रतीच्या ज्वारीचा किरकोळ बाजारातील प्रतिकिलो दर १०० रुपयांच्या पुढे गेला. उत्तम प्रतीच्या शाळू आणि गावरान ज्वारीसाठी ग्राहकांना आता ११० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत.

दोन आठवड्यांत ज्वारीच्या दरात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळीत एका भाकरीचा दर कमीत कमी २५ रूपये झाला आहे. एकेकाळी सर्वसामान्यांच्या ताटातील नियमित आहार असलेली ज्वारीची भाकरी आता ताटातून गायब होण्‍याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यासह कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमावर्ती भागातील प्रमुख धान्य बाजारपेठ म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. येथील लक्ष्मीपुरी धान्य बाजारात ज्वारीची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. धान्य बाजारात विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागांतून ज्वारीची आवक होते; मात्र यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

खानावळींचेही दर वाढले

ज्वारीच्या वाढत्या दरांचा परिणाम केवळ घरगुती किराणा खर्चावर नाही, तर खानावळी आणि हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. विशेषता भाकरीचे दर वाढवले आहेत.

ज्वारीचे किरकोळ विक्रीचे दर

कमी, मध्यम प्रतीची ज्वारी : ६० ते ८० रुपये प्रतिकिलो

उच्च प्रतीची ज्वारी, शाळू : ११० ते १२० रुपये प्रतिकिलो

पन्नास वर्षांत पहिल्यांदाच कोल्हापूरच्या धान्य बाजारात चांगल्या दर्जाच्या ज्वारीचा प्रतिकिलो भाव १२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पूर्वी धान्य बाजारात रोज तीन ते चार ट्रक ज्वारीची आवक होत होती. आता मात्र ही आवक घटून केवळ एका ट्रकवर आली आहे. आवक कमी असल्याने चांगल्या प्रतीच्या ज्वारीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

वैभव सावर्डेकर, ज्वारी व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.