

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे खेटे (Jotiba Khete Yatra 2025) उद्यापासून (दि. १६) पासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन रांगेचे नियोजन केले आहे. भाविकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे.
माघ महिन्यात पाच रविवारी यात्रा भरते, त्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. यंदा माघ महिन्यांत ४ रविवार आले आहेत. या खेट्याचं वैशिष्ट्य असे आहे की, कोल्हापूरचे भाविक न चुकता दरवर्षी हे खेटे घालतात. त्याच्याबरोबर सांगली, साताऱ्यासह महाराष्ट्रातूनही भाविक मोठ्या संख्येने खेटे घालायला येत असतात. ( Jotiba Khete Yatra 2025)
याबाबतची आख्यायिका अशी आहे की, पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाच्या वधाच्या वेळी केदारनाथांना आमंत्रित केले होते. त्यामूळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले. जेव्हा आपली दक्षिणेकडील मोहीम संपली तेव्हा ते ही मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले. हे अंबाबाईला समजताच अंबाबाई कोल्हापूरहून अनवाणी पायी चालत देवाकडे आली आणि केदारनाथला न जाण्याची विनवणी केली. तेव्हा केदारनाथांनी इथंच राहण्याचे मान्य केले. साक्षात केदारनाथांचा अवतार जोतिबा डोंगरावर स्थायिक झाले. तेव्हापासून आजतागायत जोतिबा इथं सर्वांवर कृपाशीर्वाद देत आहेत. याच आख्यायिकेनुसार कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे.
कोल्हापूर ते जोतिबा डोंगरापर्यंतच्या मार्गावर अनेक भाविक पायी येताना यावेळी पाहायला मिळतात. अनेकजण गायमुख मार्गे पायऱ्यांवरून चढत जातात. अक्षरशः हा मार्ग भाविकांनी फुलून गेल्याचे दिसते. काहीजण कोल्हापुरातून न जाता जोतिबाच्या पायथ्याला असणाऱ्या कुशिरे गावात आपली वाहने लावून कुशिरे ते जोतिबा डोंगर या पायवाटेने जातात.