

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य मंदिरात श्रीदत्त गोपाळकाला उत्सवास बुधवारपासून (दि.१२) उत्साहात प्रारंभ होणार आहे. हा उत्सव सात दिवस सुरू राहणार असून उत्सव काळात अहोरात्र मंदिराचे दार उघडे राहणार आहे.
या काळात नित्य कार्यक्रमाबरोबर श्रीदत्त चरणावर पंचामृत पूजा, सायंकाळी ७ नंतर महापूजा, मध्यरात्री दोननंतर पालखी सोहळा संपन्न होणार आहे. विशेष कार्यक्रमात गायन, व्हायोलिन, हार्मोनियम असे रंगतदार कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकातील नामवंत कलाकार सर्वश्री मंदार चितळे, कृष्णेन्द्र वाडीकर, अतुल खांडेकर, धनंजय गाडगीळ हे सहभागी होणार आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव सुरू राहणार असून या दिवशी सायंकाळी सात वाजता धुपारती, रात्री पालखी व शेजारती असे कार्यक्रम होतील, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सेक्रेटरी गजानन गेंडे पुजारी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे