कोल्हापूर : पानपट्टीचालकाकडे साडेसहा कोटी कुठून आले? : रविकिरण इंगवले

कोल्हापूर : पानपट्टीचालकाकडे साडेसहा कोटी कुठून आले? : रविकिरण इंगवले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओ जागेच्या बदल्यात पर्यायी जागा देणे अथवा टीडीआर देण्याबाबत शासन आदेश चुकीचे आहेत. या जागेच्या व्यवहाराच्या दस्त नोंदणीसाठी सचिन राऊत यांनी साडेसहा कोटी रुपये भरले आहेत. पानपट्टीचालक असणार्‍या राऊत यांच्याकडे एवढी रक्कम कुठून आली, याचा तपास करावा तसेच या व्यवहारा विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इंगवले म्हणाले, स्टुडिओबाबत निर्णय घेताना शासनाने जनसुनावणी घेणे गरजेचे होते. या जागेवर असणार्‍या पन्नास हजार रुपयांच्या कर्जाची फेड होत नसल्याने बँकेकडून लिलावात ही जागा लता मंगेशकर यांनी घेतली. यानंतर या जागेची आता दुसर्‍यांदा विक्री झाली आहे. या जागेचा दस्त नोंदवताना सचिन राऊत यांनी साडेसहा कोटी रुपये कुठून आणले? या कंपनीतील भागधारक म्हणून ऋतुराज क्षीरसागर असून अनावधानाने हा व्यवहार झाल्याचे तेव्हा राजेश क्षीरसागर यांनी सांगितले होते. याबाबतची सत्यता तपासण्यासाठी क्षीरसागर व राऊत यांची ईडीमार्फत चौकशी होऊन नार्को टेस्ट करावी.

आयकर कार्यालयात बुधवारी जाऊन राऊत हे आयकर विवरण पत्र भरतात. त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली का, याबाबतचे निवेदन आयकर अधिकार्‍यांना देणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनीही या जागेचे हस्तांतरण करू नये, अशा मागणीचे निवेदन दिल्याचे इंगवले यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, स्मिता माने आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news