kolhapur | गोड गुळाचा काळा बाजार; ऊस संपला साखरेचा आधार

साखर, केमिकल मिश्रणामुळे कोल्हापुरी गूळ बदनाम
kolhapur | गोड गुळाचा काळा बाजार; ऊस संपला साखरेचा आधार
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्हापूर : जिल्ह्यातील काही गुर्‍हाळघरांची धुराडी वर्षभर पेटलेली असतात. ऊस संपला असताना अशा गुर्‍हाळांमध्ये गूळ कशापासून तयार होतो, हा प्रश्न आहे. साखर, केमिकलचा वापर करून गूळ तयार केला जातो. या प्रकारामुळे कोल्हापूरच्या गुळाचा दर्जा खालावत असून तो बदनामही होत आहे. भेसळयुक्त गूळनिर्मितीकडे बाजार समिती, अन्न औषध विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. अशा पद्धतीने तयार होणार्‍या गूळनिर्मितीला चाप बसविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर ते मार्चपर्यंत ऊस हंगाम चालतो. कोल्हापूरमधील उसापासून तयार होणारा गूळ दर्जेदार असल्यामुळे मोठी मागणी आहे; मात्र कोल्हापुरी गुळाला गेल्या काही वर्षांपासून भेसळयुक्त गुळाचा डाग लागला आहे. येथील गुळाचा सर्वोत्तम दर्जा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

समितीमध्ये वर्षभर आवक सुरू

समितीमध्ये गुळाची आवक वर्षभर सुरू असते. जिल्ह्यातला ऊस संपला आहे. कर्नाटकमधील उसावर काही गुर्‍हाळे सुरू आहेत, तर काही गुर्‍हाळांमध्ये साखरेपासून गूळनिर्मिती होते. 1 एप्रिलपासून आजपर्यंत समितीत 53 हजार गूळ रव्यांची आवक झाली आहे.

गुजरातकडून आजपासून गूळ खरेदी बंद

गुजरातमधील अन्न-औषध विभागाच्या तपासणीत गुळात सल्फरचे प्रमाण जास्त दिसून आले. यामुळे गूळ व्यापार्‍यांवर कारवाई झाली आहे. हा गूळ कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकमधून पुरवठा झाला असल्याने सोमवारपासून येथील गूळ खरेदी बंद केली आहे. यामधून जिल्ह्यात केमिकल, साखरेपासून गूळनिर्मिती सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

बाजार समिती, अन्न- औषधला जाग केव्हा?

कोल्हापूर बाजार समितीने शेतकर्‍यांना केवळ पत्राद्वारे गुळात कलरचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या. अन्न-औषध प्रशासनाचे या प्रकाराकडे लक्ष नाही. भेसळयुक्त गूळनिर्मितीला चाप बसविण्यासाठी समिती, अन्न-औषध प्रशासनाला जाग केव्हा येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news