

सरूड: पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुका हा जंगलासह नैसर्गिक साधन संपत्तीने व्यापलेला आहे. तालुक्यातील बेकायदा बेसुमार जंगलतोड तसेच गौण खनिज उत्खनन ही मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. याचीच साक्ष म्हणून बुरंबाळ येथील गट क्रमांक १८ मध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बेकायदेशीर उत्खननाकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
उत्खननासाठी प्रशासनाची आवश्यक परवानगी घेतलेली नाही. या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करून संबंधित दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबत शिवसेना तालुका प्रमुख दत्तात्रय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी नायब तहसीलदार गणेश लवे यांना शुक्रवारी (ता.१६) निवेदन दिले आहे.
उत्खनन करणाऱ्या घटकांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाई करण्यात टाळाटाळ झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख योगेश कुलकर्णी, उपतालुकाप्रमुख निवास कदम, युवा सेना उपतालुकाप्रमुख जयसिंग डाकवे आदी उपस्थित होते.
हेही वाचा