आमचं पक्कं ठरलंय; ‘कोल्हापूर’ची चिंता नाही : उद्योगमंत्री उदय सामंत | पुढारी

आमचं पक्कं ठरलंय; ‘कोल्हापूर’ची चिंता नाही : उद्योगमंत्री उदय सामंत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय, तुमचं ठरलंय’ची निवडणुकीत लय चर्चा असते. हे शब्द कोल्हापुरात माहीत आहेत; परंतु यावेळी आमचं पक्कं ठरलंय, आम्हाला कोल्हापूरची काहीही चिंता नाही, असे सूचक वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी येथे केले.

कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन शुक्रवारपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी अधिवेशनस्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘अधिवेशनाला यायला लागतंय’ ही टॅगलाईन आम्ही घेतली असून, या अधिवेशनात अनेक जणांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणासह सर्व विषयांवर पत्रकारांशी गप्पा मारल्या. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी स्वंतत्र अधिवेशन घ्यायचे आहे; परंतु मनात आले म्हणजे अधिवेशन घेता येत नाही. त्यासाठी प्रक्रिया राबवावी लागते. ते काम सुरू आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी मला काहीच म्हणायचे नाही. त्यांनी एक मोठे आंदोलन उभे केले आहे. स्वत:च्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांनी हे आंदोलन करावे, इतकेच त्यांना माझे सांगणे आहे.

मुख्यमंत्री आश्वासन पूर्ण करणारे नेते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरातूनच अधिवेशनाची किंवा प्रचाराची सुरुवात करायचे. कोल्हापूरला एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे आम्हीदेखील करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच प्रचाराची सुरुवात करणार आहोत, असे सांगून सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आश्वासन पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना जे आश्वासन दिले आहे, ते नक्की पाळतील. गरज पडल्यास आणि शिंदे यांनी आदेश दिल्यास मीदेखील शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात शेट्टी यांच्याशी चर्चा करायला तयार आहे.

Back to top button