वारणेत आज आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम

वारणेत आज आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम

वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त आज (बुधवारी) वारणानगर येथे भारतविरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्तीसह देशातील नामवंत कुस्त्यांचा महासंग्राम रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर कुस्ती मैदानाची तयारी पूर्ण झाली असून, वारणानगरी कुस्ती शौकिनांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी रात्री आमदार डॉ. विनय कोरे यांनी या मैदानाची अंतिम पाहणी केली.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने संस्थापक सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणार्थ आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित केले आहे. वारणा विद्यालयाच्या पटांगणावर खास कुस्ती मैदान तयार करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता 'विश्वनाथ शक्ती श्री' कुस्ती मैदानास प्रारंभ होईल. या मैदानात प्रमुख अकरा किताबांसह 35 पुरस्कृत आणि दोनशेवर कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.

देश-विदेशासह भारतातील नामांकित मल्लांची निवड या कुस्ती महासंग्रामासाठी केली आहे. या मैदानातील महत्त्वपूर्ण लढतींसाठी इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता अहमद मिर्झा व दुसरा आंतरराष्ट्रीय विजेता रिझा इराणी येणार आहेत. यासह नामवंत मल्ल येणार असून, प्रथम क्रमांकाच्या 'जनसुराज्य शक्ती श्री' किताबासाठी महाराष्ट्राचा सिकंदर शेखविरुद्ध मोनू दहिया (दिल्ली) यांच्यात अटीतटीची लक्षवेधी लढत होणार आहे. त्यामुळे यासह प्रमुख किताबाच्या कुस्त्यांकडे महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यांतील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून आहे. या कुस्ती महासंग्रामाचा लाभ कुस्ती शौकिनांनी घ्यावा, असे आवाहन आ. डॉ. विनय कोरे यांनी केले आहे. या मैदान पाहणीवेळी प्रा. जीवनकुमार शिंदे, वारणा कुस्ती केंद्राचे संदीप पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news