कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रस्तावित नागपूर – गोवा भक्ती मार्गावर आदमापूर व गारगोटी (ता. भुदरगड) आणि घाटकरवाडी (ता. आजरा) येथे आंतरवाहिनी रस्ता करण्यास मंगळवारी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
भक्ती मार्गाला दाजीपूर अभयारण्य जोडण्यासाठी मुदाळ तिट्टा – सरवडे -मांजरखिंड हा 17 कि.मी.चा रस्ता दुपदरी करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
नागपूर-गोवा भक्ती मार्गासाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 800 कि.मी. लांबीच्या या सहापदरी रस्त्याची अधिसूचना रस्ते विकास महामंडळाने काढली आहे. या मार्गाने राज्यातील 20 मोठी धार्मिक स्थळे जोडली जाणार असून त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थानचा समावेश
केला आहे.
शिवडाव-सोनवडे घाटही भक्ती मार्गाला जोडणार
या मार्गावर आदमापूर, गारगोटी आणि घाटकरवाडी या ठिकाणी आंतरवाहीनी रस्ते उभारण्याचा निर्णय आज झाला. नवले (ता. भुदरगड) येथे सर्व्हिस रोड करण्यासही मान्यता दिली. यामुळे भविष्यात शिवडाव-सोनवडे घाट या भक्ती मार्गाला जोडला जाणार आहे.
मुदाळ तिट्टा – मांजरखिंड दुपदरी होणार
हा मार्ग राधानगरी विधानसभा मतदारसंघातून जात असल्याने राधानगरी-दाजीपूर अभयारण्यही या मार्गाला जोडले जाणार आहे. याकरिता मुदाळ तिट्टा-सरवडे-गैबी ते मांजरखिंड हा 17 कि.मी.चा रस्ता दुपदरी करण्यासही मान्यता देण्यात आली. या रस्त्याचाही प्रकल्पात समावेश करा, असे आदेशही मंत्री भुसे यांनी दिले.
बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, रस्ते विकास महामंडळाचे उपमुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता एस. के.सुरवसे, सहसंचालक भोपळे, उपसचिव दिपाली नाईक, अधीक्षक अभियंता व्ही. एल. कांबळे, कार्यकारी अभियंता मुक्तार शेख, अवर सचिव राहुल गिरीबुवा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.