

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'बेकरीमधील खाद्य पदार्थ फुकट का खायला देत नाहीस', अशी विचारणा करत घरात घुसून सराईत गुन्हेगारांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या उद्यमनगर येथील बेकरी व्यावसायिक शिवकुमार लक्ष्मीनारायण बघेल (वय 33, रा. यादवनगर) याचा सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी अटक केलेल्या दोघाविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश सतीश शिंगे (वय 23, रा. यादवनगर) व दिलीप हिंदुराव पाटील (33, रायगड कॉलनी, पाचगाव) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. गुरुवारी दि. 28 डिसेंबरला दुपारी ही घटना घडली होती. मारहाणीत जखमी बेकरी व्यावसायिकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. संशयित सध्या पोलिस कोठडीत आहेत.
सराईत गुन्हेगारांची दहशत
राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष करून उद्यमनगरसह परिसरात सराईत गुन्हेगारांसह काळेधंदेवाल्यांची दहशत वाढली आहे. नागरिकांकडून तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
खुनाचा गुन्हा दाखल
निर्मला शिवकुमार बघेल (वय 33, रा. उद्यमनगर) यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. हल्लेखोर शिंगे आणि पाटील या दोघांना अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतदेह रस्त्यावर ठेऊन निषेध
शिवकुमार बघेल यांचा मृतदेह यादवनगर येथे आणताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला. काही काळ मृतदेह रस्त्यावर ठेवून नातेवाईकांनी शिवकुमार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.