

विशाळगड : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आंबा-विशाळगड मार्गावर सध्या वन्यजीवांचे 'राजेशाही' दर्शन घडत आहे. विशाळगड घाटातील निसर्गरम्य आणि निर्जन समजल्या जाणाऱ्या वाघझरा वळणावर एका महाकाय गव्याने भररस्त्यात दर्शन दिल्याने पर्यटकांची चांगलीच धावपळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अशातच, हा भलामोठा गवा एखाद्या सम्राटासारख्या ऐटीत आणि संथ लयीत रस्त्यावरून चालत असताना अचानक समोर आला. गव्याचा हा बिनधास्त वावर पाहून वाहनधारकांची 'पाचावर धारण' बसली होती. काही धाडसी पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखून हा थरारक क्षण कॅमेऱ्यात टिपला, तर काहींनी भीतीपोटी गाड्या थांबवणेच पसंत केले.
निसर्गप्रेमींचे आवाहन:
हा मार्ग घनदाट अरण्यातून जात असल्याने वन्यप्राण्यांचे दर्शन होणे स्वाभाविक आहे. मात्र, भरदिवसा मुख्य रस्त्यावरील या वावरामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन्यजीवांना पाहून गोंधळ घालू नये किंवा त्यांच्या जवळ जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.
वन्यजीव दिसल्यास गाडीचा हॉर्न वाजवू नका.
प्राण्यांना खायला घालण्याचा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.
शांतता राखून त्यांना रस्ता मोकळा करून द्यावा.
वन्यजीवांच्या या दर्शनामुळे एकीकडे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे स्थानिक आणि प्रवाशांमध्ये भीतीची हलकी लाटही पाहायला मिळत आहे.