

राजेंद्र जोशी
कोल्हापूर: पावसाच्या अचानक विश्रांतीनंतर देशात वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढू लागली असतानाच देशातील औष्णिक वीज केंद्रामधील कोळशाचा साठा झपाट्याने घसरला आहे. केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या माहितीनुसार १९ सप्टेंबरअखेर हा साठा २२.९ दशलक्ष टनांवर आहे. उपलब्ध साठा केवळ सात दिवसांच्या वीजनिर्मितीसाठी पुरेल इतकाच राहिला आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (सीईए) आकडेवारीनुसार १९० औष्णिक वीज केंद्रांपैकी ७४ केंद्रांमध्ये साठा गंभीर पातळीवर पोहोचला आहे.
यामुळे देशातील विजेचा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारला खाणीपासून औष्णिक वीज केंद्रांपर्यंत कोळसा पोहोचविण्यासाठी वाहतुकीच्या कसोटीवर उतरावे लागणार आहे.
कोळसा वाहतुकीचा मुद्दा कळीचा
भारतात सध्या कोल इंडियाच्या खाणमुखांवर ७६ दशलक्ष टन कोळसा उपलब्ध आहे. पावसाळ्यात कोळसा उत्पादनाचे काम ठप्प झाले असले, तरी कोल इंडियाकडे असलेला उपलब्ध कोळसा देशातील औष्णिक वीज केंद्रावरील संकट दूर करण्यास उपयुक्त ठरू शकतो. परंतु, कोळशाची खाणीपासून केंद्रापर्यंतची वाहतूक हा कळीचा मुद्दा आहे.
रेल्वे रेकची संख्या २७७ वरून ४४४ वर
सध्याची घट संरचनात्मक कोळसा टंचाईपेक्षा तात्पुरत्या लॉजिस्टिक अडचणीशी संबंधित असल्याचे राष्ट्रीय पतमानांकन संस्थांचे म्हणणे आहे. यामुळे केंद्र सरकारने वीज क्षेत्रासाठी कोळसा वाहून नेणार्या रेल्वे रेकची संख्या २७७ वरून ४४४ वर नेली आहे. हा कोळसा निर्धारित वेळेत पोहोचला, तर वीज संकट दूर होऊ शकते.
भारतात सध्या कोळशाच्या साठ्यामध्ये झालेली घट ही २०२३ नंतरची सर्वांत नीच्चांकी आहेे. २०२३ मध्ये हा साठा साडेसात दिवसांवर आला होता, तर २०२१ मध्ये तो चार दिवसांपर्यंत घसरला होता.
ऑगस्टपासून वीज केंद्रांवर कोळशाचा साठा कमी होतो आहे. ३१ ऑगस्टला २९ दशलक्ष टन असलेला साठा सप्टेंबरमध्ये २४ टक्क्यांनी कमी झाला. गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कोळसा साठ्याच्या तुलनेत ४२ टक्क्यांची घट झाली होती. त्याच काळात कोळशावर आधारित वीज निर्मिती सुमारे १३ टक्क्यांनी वाढली. वाढत्या वीज मागणीचा थेट परिणाम सध्या कोळशाच्या साठ्यावर होतो आहे.
ऑक्टोबरमध्ये वीज मागणी वाढणार...
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या निकषानुसार निर्धारित साठ्यापेक्षा २५ टक्क्यांनी कमी साठा किंवा तीन दिवसांपेक्षा कमी काळ वीज निर्मिती करता येईल एवढाच कोळसा शिल्लक असल्यास स्थिती गंभीर समजली जाते.
देशात सध्या जुलै-ऑगस्टमध्ये स्थिर राहिलेली वीज मागणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा २५५ गिगावॅटच्या पुढे गेली आणि काही वेळा तिने २६७ गिगावॅट इतकी मागणी नोंदविली. मे महिन्यात यंदाची सर्वाधिक २७० गिगावॅट मागणी नोंदविली गेली होती.
सप्टेंबरमध्ये जर २६७ गिगावॅटची मागणी नोंदविली जात असेल, तर समोर उभा असलेला ऑक्टोबरचा उष्मा लक्षात घेता ही मागणी वाढू शकते. यामुळेच कोळसा मंत्रालय सध्या कोल इंडियाच्या खाण मुखावर असलेला कोळसा औष्णिक केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी तारेवरची कसरत करते आहे.