कोल्हापूर : अनुराधा कदम
ती कुठेच सुरक्षित नाही... इतकेच काय, तर ती नातेवाईकांत, रक्ताच्या नात्यातही सुरक्षित नाही. बाहेर गेलेली मुलगी, महिला घरी सुरक्षितच काय, जिवंत परत येईल की नाही, याची खात्री नाही. महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटनांनी समाजाला कीड लावली आहे. या वासनांध विकृतीला चिमुकल्यांपासून ज्येष्ठ महिला बळी पडत आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेवर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे असताना आता किती दिवस फक्त मेणबत्ती जाळायची? नराधमांना जरब कधी बसणार? महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी समाजमनाचा उद्वेग असा टिपेला पोहोचला आहे. दिवसाढवळ्या मुलींवर बलात्कार होतो. लैंगिक शोषण होते. बलात्कारानंतर खून केला जातो.
तिची जीभ छाटली जाते. गुप्तांगावर शस्त्राने वार केले जातात. अशा घटना घडल्या की, मोर्चे निघतात, मेणबत्त्या जाळून निषेध केला जातो. संशयितांवर फक्त खटले सुरू राहतात. कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर येथे चार वर्षांच्या बालिकेचे लैंगिक शोषण झाले.
या विरोधात निषेधाचा सूर शांत झाला नाही, तोवर शियेतील दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली. यासारख्या घटनांनी दर तीन मिनिटांनी देश हादरत असतो. महाराष्ट्रात पाच वर्षांत लैंगिक अत्याचाराच्या साडेतीन हजार घटनांची नोंद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७ महिन्यांत अत्याचाराच्या ११० घटना घडल्या. पोलिसांपर्यंत येत नाही तो आकडा वेगळाच.
रयतेच्या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करण्यांना कायद्याची जरब बसवली. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढले जात. हात-पाय तोडले जात. कडेलोट केला जायचा.
कायद्याची ही भीती इतकी होती की, महिलांना त्रास देण्याचे धाडस कुणी करत नसे. आजच्या महाराष्ट्रातील महिलांची असुरक्षितता पाहता पुन्हा शिवकाळातील कठोर शिक्षा सुनावण्याची वेळ आली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार (एनसीआरबी) रोज सरासरी ८७ लैंगिक अत्याचार होतात. दरवर्षी हे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढते. गेल्या पाच वर्षांत आठ लाखांहून अधिक महिलांवर बलात्कार झाल्याचे आकडेवारी दर्शवते. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही लैंगिक शोषण करून जीवे मारण्याचे प्रमाण जास्त आहे. बलात्काराच्या ३७ टक्के घटनांमध्ये पीडितेचा खून करणे किंवा तिच्या गुप्तांगावर शस्त्राने वार करणे, जीभ छाटणे असे क्रूर प्रकार केले जातात.