आधुनिक तंत्रज्ञान वापरून बँक अधिक सक्षम करा : अदिती तटकरे

आधुनिक तंत्रज्ञान वापरून बँक अधिक सक्षम करा : अदिती तटकरे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मोठ्या शहरामधील बँका तग धरू शकल्या नाहीत. अशा स्थितीत कै. वसंतराव पंदारे यांनी लावलेल्या शिस्तीमुळे राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँक सक्षमपणे उभी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही बँक अधिक सक्षम करा. त्यासाठी बँकेला सहकार्य राहील, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-ऑप. बँकेच्या येथील मुख्य कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक कै. वसंतराव पंदारे सभागृहाचे उद्घाटन व तैलचित्राचे अनावरण मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. अनिकेत तटकरे उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या, अनेक संघर्षांशी सामना करत कै. वसंतराव पंदारे यांनी या बँकेची प्रगती साधली. त्याच विचाराने रवींद्र पंदारे यांच्या नेतृत्वाखालील या बँकेचा वटवृक्ष झाला आहे. नवीन पिढीला वसंतराव पंदारे यांच्या कार्याची माहिती व्हावी, यासाठी त्यांना बँकेशी जोडावे. तसेच कै. वसंतराव पंदारे यांचे जीवन पुस्तकरूपाने समाजापुढे आणावे.

आ. अनिकेत तटकरे म्हणाले, एकीकडे सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण सुरू असताना, राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्‍व्हंटस बँकेने स्वबळावर बँक चालवून या बँकेने राज्यातील सहकारावर आपली छाप पाडली आहे. बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कै. वसंतराव पंदारे यांच्यामुळेच निवृत्तीनंतरही कर्मचार्‍यांचे बँकेचे सभासदत्व कायम राहण्यास मदत झाल्याचे संचालक शशिकांत तिवले यांनी सांगितले. यावेळी संचालक रवींद्र पंदारे, मेघा रवींद्र पंदारे, प्रा. मधुकर पाटील यांची भाषणे झाली.

आजच्या समारंभास दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगत दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवला.

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, संचालक एम. एस. पाटील, प्रकाश पाटील, रोहित बांदिवडेकर, विलास कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, संजय खोत, हेमा पाटील, मनुजा रेणके, किशोर पोवार, अरविंद आयरे, दीपक पाटील, गणपत भालकर आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार मानले.

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा संदेश

गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेत स्वातंत्र्यसैनिक वसंतराव पंदारे सभागृहाचे नामकरण व कै. वसंतरावांच्या तैलचित्राचे अनावरण समारंभास उपस्थित राहणे मला आवडले असते. तथापि कार्यबाहुल्यामुळे मी परगावी असल्याने या कार्यक्रमास येऊ शकलो नाही. कै. वसंतराव पंदारे यांचे आपल्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याशी असलेला स्नेहबंध मी जपून ठेवला आहे. सामाजिक व्यक्तिमत्त्व असलेल्या कै. वसंतराव पंदारे यांची द़ृष्टी प्रागतिक आणि विधायक होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव म्हणून त्यांनी भरीव काम केले आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान संस्मरणीय आहे. श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात 16 जुलै 1978 या दिवशी आपण काही दलित दाम्पत्यांचा प्रवेश करवून त्यांच्याहस्ते अभिषेक घडवून आणला. माझ्या या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला देवस्थान समितीचे सचिव असलेल्या वसंतराव पंदारे यांनी सक्रिय समर्थन दिले. ते माझ्या बाजूने ठाम उभे राहिले. बँकेच्या सभागृहास वसंतराव पंदारे नाव देणे अत्यंत योग्य आहे. या निर्णयाबद्दल अध्यक्ष आणि सर्व संचालकांचे अभिनंदन करतो, तसेच आपल्या या सोहळ्याला माझ्या शुभेच्छा!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news