देशातील तुरुंग बनले कोंडवाडे!

देशातील तुरुंग बनले कोंडवाडे!

कोल्हापूर : देशातील कारागृहे आणि त्यांची अवस्था शोचनीय झाली आहे. बहुतांश कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा किती तरी अधिक कैद्यांची भरती झाली आहे. विशेष म्हणजे, शिक्षा झालेल्या कैद्यांपेक्षा कच्च्या कैद्यांच्या भरमसाट संख्येमुळे बहुतांश कारागृहे हाऊसफुल्ल झालेली दिसत आहेत. महिला कैदी आणि कारागृहांची अवस्था तर भयावह म्हणावी अशी आहे.

देशातील एकूण कारागृहांची संख्या 1319 इतकी आहे. त्यामध्ये 148 मध्यवर्ती, 424 जिल्हा कारागृहे, 88 खुली, 41 विशेष आणि 32 महिला कारागृहे आहेत. याशिवाय 564 उपकारागृहे, 19 बाल सुधारगृहे आणि 3 अतिविशेष कारागृहे आहेत. सर्वाधिक 14 मध्यवर्ती कारागृहे ही दिल्लीत आहेत.

इथे आहेत कोंडवाडे!

कैद्यांची सर्वाधिक गर्दी ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, सिक्कीम आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये झालेली दिसते. सध्या या राज्यांमधील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा 165 ते 185 टक्के कैद्यांची भरती झालेली दिसत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातूनही ही कारागृहे धोकादायक ठरत आहेत.

कच्च्या कैद्यांची भरमार!

देशातील कारागृहांमध्ये सध्या 5 लाख 54 हजार 34 कैदी आहेत. विशेष म्हणजे यापैकी केवळ 1 लाख 22 हजार 852 एवढेच कैदी शिक्षा झालेले आहेत. बाकीचे 4 लाख 27 हजार 165 कैदी हे कच्चे कैदी आहेत. केवळ जामीन मिळाला नसल्याने हे चार लाखांवर कैदी मागील चार-पाच वर्षांपासून कारागृहात खितपत पडलेले आहेत. देशातील बहुतांश कारागृहांना आजकाल या कच्च्या कैद्यांचाच भार वहावा लागत आहे. देशातील कारागृहांमध्ये शिक्षा झालेले केवळ 22 टक्के कैदी आहेत, तर 78 टक्के कच्चे कैदीच आहेत.

गुन्ह्यांचे प्रमुख प्रकार!

बहुतांश कैदी खून, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न या तीन प्रमुख कारणांमुळे कारागृहात पोहोचल्याचे दिसते. कारागृहातील 67.3 टक्के कैदी हे खुनाच्या आरोपातील आहेत. त्या खालोखाल 14.9 टक्के कैदी हे बलात्काराच्या आरोपाशी निगडित आहेत. 6.2 टक्के कैदी हे मारामारी किंवा खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपावरून कारागृहात आलेले आहेत. हुंड्यासाठी छळ आणि खुनाच्या आरोपातील कैद्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेष म्हणजे चोरीसारख्या गुन्ह्यातील कैद्यांचे प्रमाण अत्यंत कमी असलेले दिसते.

महिला कैद्यांची दैन्यावस्था!

देशात एकूण 32 महिला कारागृहे असून त्यांची क्षमता 6767 इतकी आहे. मात्र, देशात सध्या 22 हजार 918 महिला कैदी आहेत. यापैकी 3808 महिला कैद्यांना महिलांसाठीच्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे, पण बाकीच्या 19 हजार 110 महिला कैद्यांना पुरुष कैद्यांसाठी असलेल्या कारागृहातच ठेवण्यात आलेले आहे. यापैकी शिक्षा झालेल्या 216 महिलांची 246 लहान मुलेही त्यांच्या आईसोबत कारागृहात खितपत पडली आहेत.

कारागृह प्रशासन!

अन्य शासकीय विभागांप्रमाणेच देशातील कारागृह प्रशासनातही मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. 89 हजार 479 जागांपैकी 64 हजार 449 कर्मचारी कार्यरत आहेत. तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक अशा जवळपास 15 हजार जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे सध्या कारागृहात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांपैकी केवळ 20 टक्केच कर्मचारी प्रशिक्षित असल्याचे दिसून येते.
(संदर्भ : प्रिझन स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया)

कैद्यांची भाऊगर्दी!

देशातील या सर्व कारागृहांची मिळून एकूण कैदी धारण करण्याची क्षमता 4 लाख 25 हजार 609 इतकी आहे. असे असताना आज या कारागृहांमध्ये 5 लाख 54 हजार 34 कैदी भरलेले आहेत. अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा 130 ते 186 टक्क्यांपर्यंत कैद्यांची भरती झालेली दिसत आहे. सर्वाधिक म्हणजे तब्बल 2.54 लाखांवर कैद्यांची गर्दी ही जिल्हा कारागृहांमध्ये झालेली दिसत आहे. कारण बहुतांश कच्चे कैदी याच कारागृहात कोंबले जातात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news