

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
कोल्हापूर या साखर उत्पादक जिल्ह्यात साखर कारखानदारांतच लढाई होत आहे. दहापैकी सहा मतदारसंघांत साखर कारखानदार परस्परांविरोधात लढत आहेत तर दोन ठिकाणी स्वतंत्रपणे ही लढत आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दरवर्षी साडेसात हजार कोटी रुपये देणार्या या उद्योगातून नेत्यांमध्येच परस्परांविरुद्ध लढत होत आहे. एवढेच नव्हे तर एवढे कारखानदार रिंगणात असूनही ऊस दर आणि फरकाची रक्कम याची चर्चा कुठेच होत नाही.
द़ृष्टिक्षेपात जिल्ह्यातील साखर उद्योग
7 लाख 50 हजार : ऊस उत्पादक
7 हजार 547 कोटी रुपयेगेल्यावर्षी एफआरपीपोटी मिळालेली रक्कम
265 लाख मेट्रिक टन : उसाचे उत्पादन
280 लाख क्विंटल : साखरेचे उत्पादन
जिल्ह्यात सहकारी व खासगी तत्त्वावरील 21 साखर कारखाने आहेत. 265 लाख टन उसाचे उत्पादन घेणार्या या जिल्ह्यातून 12 ते 13 टक्के असा सर्वाधिक उतारा मिळतो व 280 लाख क्विंटल साखर तयार होते. 7 लाख 50 हजार ऊस उत्पादकांना 7 हजार 547 कोटी रुपये एफआरपीच्या रूपाने दिले जातात. एवढ्या प्रचंड साखर औद्योगिक साम्राज्यातील नेत्यांमधील झुंज चर्चेचा विषय ठरली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक अशी लढत आहे. ऋतुराज पाटील यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व असलेला डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना आहे तर अमल महाडिक हे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कागलला हसन मुश्रीफ हे सरसेनापती संताजी घोरपडे या खासगी साखर कारखान्याचे संस्थापक आहेत; तर समरजित घाटगे हे शाहू सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व करीत आहेत.
करवीरला काँग्रेसचे राहुल पाटील यांच्या मागे भोगावती साखर कारखान्याची ताकद आहे. कै. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील विजयी झालेले संचालक मंडळ तेथे सत्तेत आहे. शिंदे शिवसेनेचे चंद्रदीप नरके हे कुंभी कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राधानगरी- भुदरगडला शिवसेना ठाकरे गटाचे के. पी. पाटील हे दूधगंगा वेदगंगा बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत; तर शिंदे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे देवर्डे सहकारी साखर कारखाना या नियोजित कारखान्याचे प्रवर्तक आहेत. अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील हे बिद्री साखर कारखान्याचे संचालक आहेत.शिरोळला महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शरद साखर कारखान्याचे चेअरमन आहेत; तर गणपतराव पाटील हे दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
शाहूवाडीत विनय कोरे हे तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी समूहाचे प्रमुख आहेत तर ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरुडकर हे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संबंधित आहेत. त्यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर तेथे उपाध्यक्ष आहेत.इचलकरंजीत राहुल आवाडे हे कल्लाप्पाणा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत. चंदगडचे राजेश पाटील यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे दौलत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते.