

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना ऊर्फ मोहम्मद अली खान ऊर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय 59, रा. मश्जिद बंदर, मुंबई) याच्या मृतदेहाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह त्याची पत्नी व नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह केरळला मृतदेह नेला.
दरम्यान, खान याच्या खुनातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी त्या त्या न्यायालयात पत्रव्यवहार सुरू केला आहे. किरकोळ वादातून खून झाला की त्यामागे कोणता कट आखण्यात आला होता याची पोलिस कसून चौकशी करणार आहेत.
मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना ऊर्फ मोहम्मद अली खान ऊर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय 59, रा. मश्जिद बंदर मुंबई) याचा रविवारी सकाळी कळंबा मध्यवर्ती कारागृहात निर्घृण खून झाला. पाच कैद्यांनी ड्रेनेजवरील सिमेंट व लोखंडी झाकण त्याच्या डोक्यात घालून हा खून केला. कट रचून हा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
याप्रकरणी मोका बंदी बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण, मोका बंदी प्रतीक ऊर्फ पिल्या सुरेश पाटील, मोका बंदी ऋतुराज ऊर्फ डेज्या विनायक इनामदार, न्यायाधीन बंदी सौरभ विकास सिद, न्यायाधीन बंदी दीपक नेताजी खोत यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर खून, सरकारी कामात अडथळा, मारामारी असे गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबतची फिर्याद धीरज जगन्नाथ जाधव (32, रा. कळंबा मिसळजवळ, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.
मुन्ना ऊर्फ मोहम्मद अली खान ऊर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता याच्या मृतदेहाचे सोमवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हे शवविच्छेदन झाले. सोमवारी सकाळी मुन्ना खान याची पत्नी के. रझिया, नातेवाईक आबिद के. पी., कमल के. एन. हे केरळमधून कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.
न्यायालयाच्या परवानगीनंतर अटक
मोका बंदी बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण, मोका बंदी प्रतीक ऊर्फ पिल्या सुरेश पाटील, मोका बंदी ऋतुराज ऊर्फ हेज्या विनायक इनामदार, न्यायाधीन बंदी सौरभ विकास सिद न्यायाधीन बंदी दीपक नेताजी खोत हे सर्व आरोपी सध्या न्यायाधीन बंदी आहेत. त्यांना अटक करण्यासाठी न्यायालयातून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी कवठेमहाकांळ, जत-इस्लामपूर, कोल्हापूर, तासगाव येथील न्यायालयांना पत्र पाठवून अटकेची मागणी केली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर संबंधित आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले.