

कोल्हापूर:
गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात करणार्या कुख्यात टोळ्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, सीमाभागात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. कायद्याचा धाकच राहिला नसल्याने जिल्ह्यातील शंभरावर एजंटांच्या साखळीद्वारे टोळ्याचे कारनामे बेधडक सुरू झाले आहेत. 2020 ते ऑक्टोंबर 2025 या काळात जिल्ह्यात दीड डझनावर गुन्हे दाखल होऊनही गर्भातच कळ्या खुडण्याचा गोरखधंदा थांबलेला दिसून येत नाही.
बालिंगा (ता. करवीर) येथील सौरभ केरबा पाटील यांच्या मालकीच्या रो हाऊसमध्ये बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्या टोळीचा प्रशासनाने भांडाफोड केला. गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी यापूर्वी सात गुन्हे दाखल झालेल्या स्वप्नील केरबा पाटील (रा. बालिंगा) याच्या सेंटरवर आरोग्य विभागासह करवीर पोलिसांनी सोमवारी छापा टाकून टोळीच्या कारनाम्याचा पर्दाफाश केला.
मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटील पोलिसांना चकवा देऊन फरारी झाला असला तरी टोळीचा मुख्य एजंट दिगंबर मारुती किल्लेदार (वय 48) पोलिसांच्या हाताला लागला आहे. पथकाने छापा टाकून 58 हजार रुपये किमतीच्या गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. त्यावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेटचा कुठेही उल्लेख असल्याचे दिसून येत नाही. पाच गोळ्यांची 98 पाकिटे हस्तगत
करण्यात आली आहेत. याशिवाय पोर्टेबल सोनोग्राफी मशिनसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. छाप्यानंतरच्या शोधमोहिमेत पथकाला आढळून आलेल्या नोंदवहीतील माहिती धक्कादायक आहे. त्यात स्वप्नील पाटील याच्यावरही कारवाई करण्यात आली होती. गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्या कळंबा येथील एका हॉस्पिटलवर करवीर पोलिसांनी वर्षापूर्वी छापा टाकून टोळीला जेरबंद केले होते.
त्यात संशयित स्वप्नील पाटील याच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर संशयिताने कारनामे सुरूच ठेवल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी दैनंदिनी नोंदी असणारी डायरीसह मोबाईल हस्तगत केले आहे. नोंदीच्या आधारे टोळीचे काळे कारनामे चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
निदानासाठी 40 ते 50 हजार; गर्भपातासाठी 70 ते 80 हजार
कार्यरत रॅकेटमधून गर्भलिंग निदानसाठी 40 ते 50 हजार रुपये तर गर्भपातासाठी 70 ते 80 हजार रुपये उकळण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. हे दर गिर्हाईकाची आर्थिक परिस्थिती पाहून ठरवला जातात. शिवाय गिर्हाईक आणणार्यालाही यातील ठरावीक कमिशन दिले जाते.
जिल्ह्यात मोठी साखळी कार्यरत
प्राप्त माहितीनुसार मुख्य संशयिताने शहरांसह जिल्ह्यात विशेष करून ग्रामीण भागात एजंटांच्या साखळीद्वारे काही महिन्यांपासून धुमाकूळ घातल्याचे नोंदीवरून दिसून येते. हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडीसह उत्तर कर्नाटकातही एजंटांची मोठी साखळी कार्यरत असल्याची माहिती चौकशीतून पुढे येत आहे.