

Shrivansh Lavate falls from gallery in Kotoli
कोल्हापूर : ‘देवतारी त्याला कोण मारी’ ही म्हण कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे अक्षरशः खरी ठरली. फक्त नशिब जोरावर सव्वा वर्षांचा श्रीवंश प्रविण लव्हटे गॅलरीतून खाली पडूनही चमत्कारिक पद्धतीने बचावला आहे. लव्हटे कुटूंबासाठी काळ बनून आलेली वेळ, नशिब बल्लवत्तर म्हणूनच माघारी परतल्याने लव्हटे कुंटुबाने देवाचे भार मानले.
नवसाने झालेल्या या बाळाची कुटुंबीयांनी फुलासारखी काळजी घेतली होती. मात्र रविवारी लव्हटे कुटुंबासाठी भीषण प्रसंग समोर आला. गॅलरीत खेळताना क्षणभर बहिणीची नजर चुकवत श्रीवंश खाली डोकावत असतानाच तो अचानक गॅलरीतून खाली कोसळला. हा प्रकार पाहणाऱ्यांच्या अक्षरशः हृदयाचा ठोका चुकला.
सुदैवाने श्रीवंशच्या डोक्याला फक्त किरकोळ दुखापत झाली असून अन्य कोणतीही गंभीर इजा झाली नाही. त्यामुळे ‘देवतारी त्याला कोण मारी’ ही म्हण गावकऱ्यांसमोर पुन्हा एकदा खरी ठरली. आई जयश्री हा प्रसंग पाहून क्षणभर गोंधळून गेली. तत्काळ कुटुंबीयांनी बाळाला उचलून रुग्णालयात नेले.
रुग्णालयात एक्स-रे व स्कॅनिंगसह सर्व तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगताच आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात दिलासा देणारे आनंदाश्रू तरळले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.